भ्रूण हत्येचा ठपका ; महिला डॉक्टर सह दोघा नर्सची कोठडीत रवानगी

धुळे जिल्हा

गर्भपात करीत भ्रूण हत्या केल्या प्रकरणी धुळे शहरातील संशयीत डॉ.सोनल वानखेडे यांच्यासह सुमन हॉस्पिटलच्या दोन नर्सेस अखेर गजाआड झाल्या आहेत. धुळे जिल्हा न्यायालयाने संशयीतांवर कुठलीही मेहरबानी न दाखवता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावून घटनेचे गांभीर्य ओळखले. सुमन हॉस्पिटलवर झालेल्या धडक कारवाईने वैद्यकीय वर्तुळ पुरता हादरले आहे.

सुमन हॉस्पिटलच्या संचालक डॉ. सोनल वानखेडे आणि त्यांच्या दोन नर्स यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात काल सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी जयश्री पुनावाला यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

धुळे महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. संपदा कुलकर्णी आणि त्यांच्या तपासणी पथकाने काल सकाळी धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे स्त्री भु्रण हत्या होत असल्याच्या तक्रारीवरुन अचानक छापा टाकला होता. त्यावेळी पथकाला रुग्णालयात एक महिला रुग्णाचा धोकादायक पद्धतीने गर्भपात केल्याचे आढळून आले होते ती महिला रुग्ण एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली होती. तिच्याजवळ एक अडीच ते तीन महिन्याचा गर्भ पडलेला होता. तसेच एक दुसरी महिला रुग्ण गर्भपातासाठी आल्याचे आणि त्या महिला रुग्णाने सुरत येथे कर्भलिंग निदान चाचणी केली असल्याचेही त्या महिलेच्या चौकशीत स्पष्ट झाले होते.

सुमन हॉस्पिटलमध्ये पथकाच्या तपासणीत कोणतेही कागदपत्रेही आढळून आली नाही. हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना देखील योग्य उत्तरे देता आली नाहीत. याप्रकरणानंतर हॉस्पिटलचे सोनोग्राफी मशील सील करण्यात आले. स्त्री भु्रण हत्या होत असल्याचे समोर आल्याने हा अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार याप्रकरणी तपासणी पथकाच्या प्रमुख तसेच धुळे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.संपदा कुलकर्णी यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानुसार काल रात्री ८ वाजता डॉ. सोनल वानखेडे यांच्यासह त्यांच्या हाताखालील नर्स रोहिणी दीपक शिरसाठ (वय ३४, रा. अनिरुध्द नगर, साक्री रोड, धुळे) आणि शोभा नरेंद्र सरदार (वय ४०, रा. भिमनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, साक्री रोड, धुळे) या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आज मंगळवारी सकाळी या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी. जे. राठोड करत आहेत.

दरम्यान या सर्व कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील आरोग्य वर्तुळात विशेषतः मॅटरनिटी हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *