मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई उपोषण सुरु तर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

मुंबई

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात करण्याआधी जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संयम पाळण्याचं आवाहन केलं. राज्यभरातुन मराठा समाजाने मुंबईत धडक मारल्याने मुंबईत अभूतपूर्व कोंडी झाली आहे. तर इकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी रंगली.

मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड गर्दी झाली असून काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी इथं जाऊन तिथं आंदोलन सुरू करावं, अशा सूचना जरांगे यांनी केल्या आहेत. दरम्यान,  मराठा आंदोलनामुळे आझाद मैदानाच्या दिशेनं येणाऱ्या विविध मार्गांवर वाहतुक पोलिसांनी निर्बंध घातले.

मराठा आंदोलनामुळे मुंबई महापालिका परिसरातील सर्व रस्ते, पूर्व द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पूर्व मुक्त मार्गांवर त्यांच्या गाड्या थांबवल्या होत्या. परंतु तिथून अनेकजण पायी आझाद मैदानात दाखल झाले. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरील रस्त्यावर ठिय्या दिला असल्यान इथली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे. सुमारे तीन हजार गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. पाच हजार लोकांनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार असं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं होते.
========
कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यास मविआ व उबाठा अपयशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकार न्यायालयीन लढाईत अपयशी ठरले,  त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्यांनी दुटप्पीपणा सोडून स्पष्ट भूमिका घ्यावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाचे जेव्हा लाखोंचे मोर्चे निघाले तेव्हा सामना दैनिकातून या आंदोलनाची टिंगल टवाळी करण्यात आली. यावरुन मराठा समाजाबाबत तुम्हाला किती कळवळा आहे, हे दिसून आले अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आजही आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती गठीत केली ती आजही काम करत आहेत.  २०१६-१७ मध्ये मराठा समजाला आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, मात्र या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टात गेले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार आणि उबाठा मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यास अपयश ठरले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
=========

७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजपा व फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून गेले. सत्ता द्या ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी वल्गणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच काय झाले? असा संतप्त प्रश्न विचारून भाजपा सरकारला आरक्षणाच्या नावाखाली फक्त मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावायची आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस पक्षाचे नेते कोल्हापूरचे खा. श्री. शाहू महाराज छत्रपती व खा. डॉ. कल्याण काळे यांनी टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण आंदोलनाबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा मराठा समाजाने तीन महिन्यापूर्वी केली होती पण सरकारने या तीन महिन्यात काहीच हालचाल केली नाही. आता मात्र मराठा समाजाची अडवणूक केली जात आहे, आधी परवानगी दिली नाही नंतर एका दिवसाची परवानगी दिली. मुंबईत वाहतूक व्यवस्थेसह परिस्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे पण मुंबईतील आजच्या परिस्थितीस भाजपा सरकारच जबाबदार आहे. तीन महिने सरकार झोपले होते काय? मुंबईतील परिस्थितीसाठी मराठा आंदोलकांना बदनाम करू नका, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

<एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत रात्री भेटून चर्चा केली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया पडून शपथ घेतली होती. जीआर काढण्याचे आश्वासन दिले, गुलाल उधळला व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलक  विजयी भावमुद्रेने गावाकडे परत गेले, शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? मराठा समाजाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली? एकनाथ शिंदे आजही सत्तेत आहेत, मराठा समाजाला दिलेला शब्द जर ते पाळू शकत नसतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. असेही सपकाळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *