धुळे जिल्हा
डीजे डॉल्बीच्या तीव्र आवाजामुळे मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. डीजे आणि लेझर लाईटमुळे अनेकांना दृष्टीदोष आणि बहिरेपण आलेले आहे. डीजेचे सर्वाधिक दुष्परिणाम जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, गरोदर महिला आणि लहान बालकांना भोगावे लागतात. त्यामुळे डीजेला कायमचे हद्दपार करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे. त्यासाठी आज सकाळी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मूक मोर्चा काढण्यात आला. घातक ठरु पाहणार्या डीजेविरोधातील या लढाईत सर्व डॉक्टर्स, वकील, जेष्ठ नागरिक, खेळाडू, शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत डीजे, लेझर लाईट वापर बंद करण्याची एकमुखी मागणी केली.
इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए च्या धुळे शाखेच्या पुढाकाराने निघालेला हा मुक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून निघून आग्रारोडने सरळ महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहचला. या ठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी विद्यार्थी, वकील, डॉक्टर्स, नर्स यांनी हातात विविध लक्षवेधी फलक घेतले होते.
उपस्थितांसमोर आएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवि वानखेडकर यांनी भुमिका मांडली, ते म्हणाले की, डीजे आणि लेझर विरुध्द आयएमएने उठवलेला आवाज हा मानवी आरोग्य आणि सार्वजनिक हितासाठी आहे. तो कोणाच्या रोजगाराविरुध्द नाही, ज्या गोष्टींचा सार्वजनिक जीवनावर दुष्परिणाम होतो त्याचा विरोध केला जात असतो. जर रोजगार आणि आर्थिक प्रश्नच असेल तर मग गावठी दारु विक्रीला तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्यांना गांजा आणि अफू पिकवण्यास परवानगी दिली जाणार काय? त्यामुळे डीजे विरुध्दची भुमिका ही सर्वसामान्य लोकांच्या हितासाठीच आहे. हा विरोध कोणत्याही सणाविरुध्द नसून कोणत्याच सणाला डिजे वाजवले जावू नये, असे आवाहन केले.
यावेळी मुक मोर्चात इंडियन मेडीकल असोसिएशन,धुळे, बार कैन्सिल, धुळे, सी.ए.असोसिएशन धुळे, होमिओपॅथी असोसिएशन धुळे, व्यापारी संघटना, धुळे, राष्ट्रीय स्वयम सेवक संघ, विश्व हिंदु परिषद धुळे, इंडियन डेंटल असोसिएशन, उच् व माध्यिमक शालेय शिक्षक संघटना धुळे, इंजिनअर असोसिएशन धुळे, निमा संघटना धुळे, वैद्यकिय प्रतिनिधी संघटना, क्रेडाई असोसिएशन, मराठा सेवा संघ, मराठा पंच मंडळ, रोटरी क्ल्ब, धुळे पत्रकार संघटना, सेंट ऍथेनी स्कुल धुळे, जयहींद इंग्लीश स्कुल व जयहिंद सिनीअर कॉलेज, पोददार इंटरनॅशनल स्कुल, चवारा इंगलीश मेडीयम हायस्कूल, आई एकविरा माध्यमिक शाळा, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी , प्राध्यापक सहभागी झाले.
————