धुळे शहर
धुळे शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरात राहत्या घरात सुरू केलेला बनावट दारुचा कारखाना नष्ट करुन धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी सण-उत्सवाचे अनुषंगाने बनावट दारु तयार करणारे अवैध कारखान्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दि.26/08/2025 रोजी पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, धुळे शहरात सहजीवन नगर येथे राहणारा गणेश नारायणराव निकम हा त्याचे राहते घरात बेकायदेशीररित्या देशी व विदेशी बनावटीची दारु अवैधरित्या तयार करुन तिची विक्री करीत असतो. सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, धुळे येथील पथक तयार करुन नमुद ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी गणेश नारायण निकम, वय-52 वर्ष, रा.प्लॉट नं.12, चक्करबर्डी रोड, शासकीय दुध डेअरी जवळ सहजीवन नगर, धुळे हा त्याचे मयत वडील नारायण बाजीराव निकम यांचे मालकीचे घरात देशी व विदेशी बनावटीची दारु अवैधरित्या तयार करण्याचा कारखाना चालविता होता.
आरोपींचे ताब्यातुन बनावट दारु बनविण्याचे साधन व साहित्य हस्तगत करण्यात आले. एकुण 1 लाख 68 हजार 90/- रु.किं.चे बनावट दारु तयार करण्यासाठीचे रसायन, साधन व साहित्य जप्त करुन, बनावट दारुचा कारखाना नष्ट करुन, धुळे शहर पोलीस ठाणे येथे मुंबई प्रोव्हीबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि. अमित माळी, पोलीस अंमलदार मच्छिद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, मपोहेकॉ. शिला सुर्यवंशी व हर्षल चौधरी अशांनी केली आहे.