हिरे महाविद्यालयातील सुसज्ज अपघात विभाग, प्रसुती कक्ष जनतेच्या सेवेसाठी सज्ज : पालकमंत्री जयकुमार रावल

पालकमंत्र्याच्या हस्ते अपघात विभाग, प्रसुती कक्षाचे लोकार्पण संपन्न

धुळे जिल्हा

श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागतिकस्तरावरील अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असा नूतन अपघात विभाग व प्रसुती कक्ष जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नूतन अपघात विभाग व स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागातील प्रसुती कक्षाचे लोकार्पण आज संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री श्री.रावल बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यास खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सयाजी भामरे, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, प्रसुतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अरुण मोरे, अधीक्षक अजित पाठक यांच्यासह सर्व प्राध्यापक व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील अत्याधुनिक अपघात विभागासाठी ५ कोटी ७९ लक्ष तसेच स्त्रीरोग प्रसुतीकक्षासाठी ४ कोटी ७९ लक्ष इतका निधी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजूर करण्यात आला होता. येथील अत्याधुनिक सुविधांमुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना अंत्यत चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळणार आहे. धुळे जिल्हा हा प्रगतीपथावर असणारा जिल्हा असल्याने आरोग्याच्या संदर्भात नागरिकांसाठी अंत्यत चांगली सुविधा यामुळे येथे निर्माण झाली आहे. हिरे महाविद्यालय हे जुने व प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालय असून याठिकाणी देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. या लोकार्पणाच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना जिल्ह्यात दिल्याबाबत मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या सहकार्यांने धुळे जिल्ह्यात आरोग्याच्या अधिक चांगल्या सुविधा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिरे महाविद्यालय हे महामार्गालगत असल्याने आपातकालीन प्रसंगी अपघातात किंवा गुंतागुतीच्या प्रसुतीवेळी वेळेत उपचार मिळणार असल्याने अनेक रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे. येथील आधुनिक व्यवस्था 24 तास जनतेच्या सेवेसाठी सुसज्ज झाली असल्याने नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी अपघात विभाग तसेच प्रसुती कक्षाची पाहणी केली.

मे. प्रथमेश इन्टरप्रायझेस, धुळे या संस्थेने प्रसुतीगृहाचे व मे. जयाग्य सोल्युशन्स्, सोलापूर या कंपनीने अपघात विभागाचे काम केले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.भामरे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *