धुळे जिल्हा
धुळे पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या नुतन शहीद स्मारकाचे लोकार्पण धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार काशिराम पावरा, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर पोलीस अधिक्षक अजय देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार आदी उपस्थित होते.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा आहे. धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेले नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची कायम आठवण करुन देईल. असा विश्वास याप्रसंगी पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केला. शासकीय कार्यालयात वीर सैनिकांच्या कुटूंबियांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत आणि त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. धुळे पोलीस दलाने शहीद जवानांसाठी ट्रस्ट स्थापना करावा. शहीद जवानांच्या परिवाराला आवश्यक तेव्हा मदत मिळण्यासाठी रावल परिवारातर्फे ५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाही पालकमंत्री रावल यांनी यावेळी केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस दलामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘सुरक्षेच्या पाऊल वाटा’या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील लष्करी व निमलष्करी दलातील शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती कल्याणी कच्छवा यांनी तर उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी मानले. कार्यक्रमास वीरपत्नी, वीरमाता, तसेच पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, नागरीक, पोलीस कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.