चार महिन्यांत पाचकंदील मार्केटमध्ये कायमस्वरूपी जागेची आमदार अनुप अग्रवाल यांची ग्वाही
धुळे शहर
शहरातील पाचकंदीलसह आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांनी पुढील चार ते पाच महिने जमनालाल बजाज रोडवर निश्चित करून दिलेल्या जागेत व्यवसाय करावा. या चार-पाच महिन्यांत पाचकंदीलमधील जुन्या फ्रूट मार्केटच्या जागेवर नवीन मार्केटचे काम सुरू करून तेथे किमान एक मजला उभारून तेथे त्यांना व्यवसायासाठी ओटे-गाळे देण्याचा सर्वमान्य निर्णय घेण्यात आला.
या संदर्भात गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शहरातील पाचकंदीलसह आग्रा रोडवरील भाजी विक्रेत्यांना जागेच्या प्रश्नावर आज येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, आमदार अग्रवाल, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, तहसीलदार (महसूल) प्रवीण चव्हाणके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, महापालिकेचे सहआयुक्त किशोर सुडके, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील, आझादनगरचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, देवपूरचे पोलिस निरीक्षक समाधान वाघ, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. घुसळकर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे व्हेजिटेबल असोसिएशन आणि कमिशन एजंट संघटनेचे अध्यक्ष, छत्रपती संभाजीराजे लोटगाडी युनियनचे अध्यक्ष, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी, भाजीपाला विक्रेते प्रतिनिधी प्रमोद चौधरी, मोठाभाऊ चोळके, बंटी चौधरी, नितीन वराडे, सुनील माळी आदी उपस्थित होते.
आमदार अग्रवाल म्हणाले, की आग्रा रोडवर भाजीपाला, फळ विक्रेत्यांसह विविध विक्रेते आपला व्यवसाय करत होते. यामध्ये भाजीपाला विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. आता आग्रा रोडवर नो हॉकर्स झोन जाहीर झाल्याने दीड महिन्यापासून या विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आग्रा रोडवर पांढरे पट्टे मारलेले आहेत. या पांढऱ्या पट्ट्यांच्या आता भाजीपाला विक्रीची परवानगी द्यावी, अशी विक्रेत्यांची मागणी असल्याचे सांगितले. यावर पोलिस निरीक्षक वारे म्हणाले, की या व्यावसायिकांना चार-पाच ठिकाणी जागा दिलेली आहे. मात्र, ते तेथे व्यवसाय न करता आग्रा रोडवरच हातगाड्या लावून व्यवसाय करतात. आता नो हॉकर्स झोन झाल्याने त्यांना आग्रा रोडला लागून गल्ली-बोळांमध्ये त्यांना पर्याय दिला आहे. मात्र, पोलिस गेल्यानंतर हे व्यावसायिक पुन्हा आग्रा रोडवर परततात. यामध्ये पोलिस प्रशासनाची अशी भूमिका आहे, की जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत ते आग्रा रोडला लागून असलेल्या विविध गल्ली-बोळांमध्ये व्यवसाय करू शकतात.
जिल्हाधिकारी विसपुते म्हणाल्या, की विक्रेत्यांना जागा ठरवून दिली आहे, तर तेथे काही दिवस व्यवसाय करण्यास हरकत नाही. कारण रस्त्यावर व्यवसाय करायचा म्हटल्यास वाहतूक खोळंबा, गर्दी आदी अडचणी उद्भवतात. यात काहीही चुकीचे घडले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर येते. त्यामुळे सर्वांनाच समजदारीची भूमिका घ्यावी लागेल. आपल्याकडे पर्यायी जागा असतील तर त्या सुचवा. तेथे चांगले मार्केट तयार करून देऊ. मात्र, रस्ते ठप्प होऊ देणार नाही. आज सगळे जण सकारात्मक आहेत. त्यानुसार आपण कायमस्वरूपी पर्याय शोधू आणि त्यानुसार कार्यवाही करू.
आमदार अग्रवाल म्हणाले, की पाचकंदीलला जे फ्रूट मार्केट आहे ते पाडून तेथे चार-पाच महिन्यांत नवीन मार्केट बांधण्याची हमी देतो. या चार महिन्यांत या नवीन मार्केटमध्ये एक मजला बांधून तेथे भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात दुकाने उपलब्ध करून देऊ. यानंतर स्वतंत्र भाजी मार्केट बांधून तेथे सर्व भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करता येईल. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात किमान चार-पाच महिने जमनालाल बजाज रोडवर सर्व भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करू द्या. तेथे जे व्यापारी विरोध करत असतील, त्यांना सांगून आपण चार-पाच महिन्यांची मुदत मागून घेऊ. त्यासाठी मीही तुमच्या सोबत व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येतो. महापालिका आयुक्तांनी सोमवारी-मंगळवारी महासभा घ्यावी, तीत फ्रूट मार्केटचा विषय घेऊन प्लॅन तयार करावा, अशी सूचना केली. हा निर्णय सर्वांनी मान्य केला.
दरम्यान, आमदार अग्रवाल यांनी आग्रा रोडसह शहरातील विविध भागांतील अतिक्रमणांचाही प्रश्न मांडत ही अतिक्रमणे तातडीने काढण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली. त्यावर जिल्हाधिकारी विसपुते यांनी शहरातील मच्छी बाजार, दत्त मंदिर, ८० फुटी रोड, १०० फुटी रोड, बारा पत्थरसह परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे हटवावीत, यामध्ये ज्या व्यावसायिकांना जागा निश्चित करून दिल्या आहेत तेथे हलवा. यामध्ये कोणाचीही गय करू नका. उघड्यावर जे मांस विक्री करतात त्यांनाही हटवा. ज्या भाजी विक्रेत्यांना जमनालाल बजाज रोडवर व्यवसाय करू दिला जाईल त्यांना ओळखपत्र द्या. त्यांच्याशिवाय दुसऱ्यांना तेथे बसू देऊ नका, असे निर्देश दिले.