‘मी सैन्य दलातला अधिकारी बोलतोय’ म्हणत सायबर भामट्याने धुळ्यातील डॉक्टरास लुबाडले 

 

धुळे शहर

-‘मी सैन्य दलातला अधिकारी बोलतोय’ अशी सुरुवात करून एकाने सैन्य दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या कारणाने एका डॉक्टरशी संपर्क साधला आणि बँक खात्यातून ९८ हजार ९६९ रुपये काढून घेतले.

सायबर पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासातच ८३ हजार रुपये डॉक्टरांना परत मिळवून दिल्यावरकूठे ‘त्या’ डॉक्टरच्या हृदयाचे ठोके संतुलित झाले.

डॉ.प्रशांत देवरे असे या प्रख्यात डॉक्टरांचे नाव आहे. त्यांच्यावरच हा प्रसंग गुदरल्याने डॉ.देवरेही सैरभैर झालेच,पण खुद्द पोलिसांच्याही भुवया या प्रकारामुळे उंचावल्या.

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ११ ऑगष्ट २०२५ रोजी ‘निदान पॅथॉलॉजी लॅब’ची ओळख देत एका व्यक्तीने डॉ.प्रशांत देवरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला.’आपण सैन्यातील अधिकारी बोलत असुन आम्हाला आमच्या जिल्हा क्रिडा संकुल जवळील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सामुहिक वैद्यकीय तपासणी करावयाची आहे.आपण आम्हाल सवलतीच्या दरात या तपासण्या करुन द्याव्यात,आपणांस आधी आमच्या कार्यालयीन सिस्टीममध्ये काही रक्कम भरावी लागेल,आवश्यक प्रक्रिया पार पडल्यावर आपण भरलेली रक्कम परत मिळेल’ असे तो म्हणाला.त्याच्या या बोलण्यावर डॉ.प्रशांत देवरे यांचा विश्वास बसल्याने त्यांनी तपासणी प्रक्रिया सुरु करण्या आधी १५ हजार रुपये भरले.त्यानंतर संबंधीत व्यक्तीने डॉ.देवरे यांना विश्वासात घेवुन त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेतला आणि डॉ.देवरे यांच्या बँक खात्यातुन ९८ हजार ९६९ रुपये काढुन घेतले.यातून डॉ. प्रशांत देवरे यांची फसवणुक झाली.

या प्रक्रियेत आपली फसवणुक झाल्याचे डॉ.प्रशांत देवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात येवुन ऑनलाईन तक्रार दाखल केली.या तक्रारीची दखल घेवून सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ संबंधीत बँकेशी संपर्क साधला आणि नोटीस पाठवली.यामुळे डॉ.प्रशांत देवरे यांच्या बँक खात्यातून काढून घेण्यात येत असलेली रक्कम थांबवून भरलेल्या रकमेपैकी ८३ हजार रुपये डॉ.देवरे यांच्या बँक खात्यात परत जमा करण्यात आले.यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील व उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांच्यासह संपूर्ण पथकाने तातडीने कार्यवाही करून बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. यामुळे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांना ही कारवाई करणे शक्य झाले.

यापार्श्वभूमीवर सविस्तर खात्री करुनच ऑनलाईन व्यवहार करावेत.कोणत्याही अनोळखीच्या व्यक्तीला आपल्या बँक डिटेल्स,इंटरनेट बँकीग युजर नेम, पासवर्ड,ए.टी.एम.किंवा क्रेडीट कार्डचे डिटेल्स किंवा ओ.टी.पी.देवु नये असे पोलिसांनी म्हटले आहे.कोणत्याही प्रकाराच्या अज्ञात लिंकवर क्लिक करु नये,किंवा एपीके फाईल मोबाईल मध्ये डाऊनलोड करु नये असेही आवाहन यानिमित्त पोलिसांनी केले आहे.
———————-
“आपण फसविले गेलो आहोत आणि आपल्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जात आहेत असे लक्षात येताच डॉक्टरांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला.यामुळे सर्वप्रथम काढली जाणारी रक्कम थांबविण्यात आली.यानंतर ती परत मिळविण्यात आली.उर्वरित रक्कमही डॉक्टरांना लवकरच परत मिळू शकेल.” 
 – प्रतीक कोळी
पोलीस उप निरीक्षक
(सायबर पोलीस ठाणे,धुळे)
————

“आपल्या सोबत सायबर फ्रॉड झाल्यास सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० व cybercrime.gov.in या संकेत स्थळावर जावुन तात्काळ तक्रार दाखल करावी.तक्रारदाराला सायबर पोलीस ठाण्यातही संपर्क साधता येईल.”
– श्रीकांत धिवरे
(जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे)
===

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *