धुळ्यातील लळींग किल्ला येथे भिम स्मृती यात्रा उत्साहात संपन्न
धुळे जिल्हा
धुळे शहरा जवळ असलेल्या किल्ले लळींग येथील लांडोर बंगला येथे आज भीमस्मृती यात्रेसाठी भीमसागर उसळला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच आंबेडकर अनुयायायींनी गर्दी करण्यास सुरवात केली होती. यानिमित्ताने आज दिवसभरात रॅलीसह, रक्तदान, अन्नदान, भीमगीते, प्रबोधनात्मक व्याख्यान, नेत्यांच्या सभा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी वंचित बहुजन आघाडीतर्फे युवानेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते लांडोर बंगल्यापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामानिमित्त ३१ जुलै १९३८ ला धुळ्यात आले असता त्यांनी लळींग येथे भेट दिली होती. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगला येथे दरवर्षी भीमस्मृती यात्रेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षीही भीमस्मृती यात्रेसाठी विविध राजकीय पक्ष, संस्था आणि सामाजिक संघटनांतर्फे भिमगितांचा कार्यक्रम, अन्नदान, रक्तदान यासह प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिकाणी दरवर्षी धुळे जिल्ह्यासह राज्यातील आणि शेजारील गुजरात, मध्यप्रदेशातील आंबेडकरी अनुयायींनी हजेरी लावत असतात. महामानवास अभिवादन करण्यासाठी भिमसैनिकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सकाळी रॅली काढण्यात येऊन महामानवाचा जयघोष करण्यात आला. बहुजन आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत युवानेते सुजात आंबेडकर यांच्यासह अरविंद निकम, जितेंद्र शिरसाट, शंकर खरात, योगेश पगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लांडोर बंगला येथे विविध मान्यवरांनी उपस्थिती देऊन डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केलेला आहे
यावेळी आरपीआयचे शशिकांत वाघ यांनी बाबासाहेबांच्या भेटी बद्दल माहिती दिली. तसेच गेली ३४ वर्ष अभिवादनाचा कार्यक्रम सुरू आहे असे सांगितले. लळिंग येथील लांडोर बंगला बाबासाहेबांच्या भेटीमुळे प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे त्यांचे येथे स्मारक उभारून पर्यटन स्थळ घोषित करावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.