नाशिक
जिल्ह्यातील मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री ९:३५ वाजता भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी गुरुवारी (दि. ३१) विशेष न्यायालयाने निकाल देत सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या निकालाचे मालेगाव शहरात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांनी या निकालाचे स्वागत करत जल्लाेष केला, तर या स्फोटातील पीडितांसह काहींनी नापसंती दर्शवत न्यायाची अपेक्षा केली.
मालेगाव शहरातील भिक्खू चौकात २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री बॉम्बस्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या स्फोटप्रकरणी खटल्याचा निकाल सतरा वर्षांनंतर आज लागला. सकाळी विशेष न्यायालयाने निकाल घोषित करताच शहरातील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोसम पूल चौकातील गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत जल्लाेष केला. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा शहराच्या पूर्व भागात निषेध करण्यात आला. बॉम्बस्फोटातील पीडितांनीही या निकालाविरोधात नाराजी व्यक्त केली.