महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख बनली बुद्धीबळ विश्वविजेती

भारताची दिव्या देशमुख हिनं फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरलं आहे. जॉर्जियाच्या बाटुमी इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं भारताच्याच हंपी कोनेरू हिच्यावर अटीतटीच्या टायब्रेकमध्ये एका गुणानं मात केली. या यशाबरोबरच दिव्या ही भारताची ८८वी ग्रँडमास्टर ठरली आहे. हंपी कोनेरू, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्यानंतरची ही कामगिरी करणारी ती चौथी महिला ग्रँडमास्टर आहे. विश्वचषक पटकावल्यानंतर आता ती महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या जू वेंजून हिला आव्हान देणार आहे.

मूळच्या नागपूरच्या असलेल्या दिव्याच्या या वाटचालीबद्दल ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेतेपद पटकावल्याबद्दल दिव्या हिचं आणि उपविजेत्या हंपीचं समाजमाध्यमाद्वारे  अभिनंदन केलं आहे. अवघ्या १९व्या वर्षी विश्वचषक मिळवणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरल्याबद्दल दिव्याचं, तर हंपी हिनं दीर्घ कारकीर्दीत सातत्याने उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही बुद्धिबळपटू भारताच्या असणं हे भारतातल्या अपार प्रतिभेचं प्रतीक असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे दिव्याचं अभिनंदन केलं आहे. तिचं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, दिव्यानं हा खिताब जिंकून संपूर्ण देशाचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा गौरव वाढवला, अशा शब्दात प्रशंसा केली आहे. दिव्यानं केवळ विजय मिळवला नाही, तर भारतासाठी बुद्धिबळाच्या इतिहासातला एक सुवर्णक्षण लिहिला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी तिचं कौतुक केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही दिव्या आणि हंपी यांचं कौतुक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *