शिंदखेडा शहर सुंदर शहर बनविण्याचा पालकमंत्री जयकुमार रावल यांचा संकल्प
धुळे जिल्हा
शिंदखेडा शहर हे सुंदर शहर बनविण्याचा संकल्प केला असून शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी 96 कोटींचा निधी मंजूर केला आहे. शहरातील विकास कामे दर्जेदार करण्यात यावी. अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्यात.
शिंदखेडा नगरपंचायतीची आढावा बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, तहसीलदार अनिल गवांदे, शिंदखेडा नगरपंचायतीचे प्रशासक पंकज पवार, शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डी. एस. गिरासे, डॉ. जी. जी. खैरनार यांच्यासह नगरपंचायतीचे विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, शिंदखेडा शहर सुंदर शहर बनविण्याचा संकल्प केला असून शहराच्या भुयारी गटारीसाठी 96 कोटी मंजूर केले असून या निधीतून शहरातील विकास कामे दर्जेदार करण्यात यावी. शिंदखेडा शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठी तांत्रिक अडचणी दुर कराव्यात. नवीन नळ जोडणी देण्यासाठी सर्व्हेक्षण करावे.
यावेळी पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते शिंदखेडा शहरात 55 लाभार्थींना शबरी घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजुर झाल्याने लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रावल म्हणाले की, शासनाने प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख पन्नास हजार एवढा निधी दिला असून या निधीतून घर 7 ते 8 महिन्यात पूर्ण करुन सुंदर अशी घरे उभारण्याच्या सूचना केल्यात. यावेळी शिंदखेडा शहरातील स्वच्छता, दिवाबत्ती व्यवस्था आणि नागरी सुविधा यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत शहरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्यात.