धुळे जिल्हा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे मुक्कामाच्या 88 वर्षानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदा दि. 31 जुलै रोजी लांडोर बंगला येथे त्यांचे पणतु सुजात आंबेडकर हे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत अभिवादनासह मोटारसायकल रॅली, भिमगितांच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्यासह रविकांत वाघ, शंकर खरात, आकाश बागुल, चंद्रमणी वाघ, योगेश पगारे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते. 31 जुलै 1937 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामासाठी धुळे येथे आले असता त्यांनी लळींगजवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. त्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी 31 जुलै रोजी आंबेडकरी अनुयायी या स्थळी मोठ्या संख्येने जमून अभिवादन करतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु सुजात आंबेडकर हे उपस्थित राहुन अभिवादन करणार आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता धुळे बसस्थानक येथील आंबेडकर स्मारकापासून मोटारसायकल रॅली निघणार आहे. रॅली विविध मार्गांनी लांडोर बंगला येथे पोहोचणार असून तेथे समता सैनिक दल आणि सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना सलामी देवून अभिवादन केले जाईल. त्यानंतर अभिवादन सभा होणार असून सुजात आंबेडकर हे उपस्थित जनतेला संबोधित करतील. तसेच पं. घनश्याम थोरात यांचे भिमगीतांचे प्रबोधनपर सादरीकरण होणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितले.