मुंबई
भारताने ५५ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०२५ मध्ये ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदके पटकावली आहेत. फ्रान्सच्या पॅरिसमध्ये १८ जुलै ते २४ जुलै २०२५ दरम्यान झालेल्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड (IPhO) २०२५ मध्ये पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकली.
महाराष्ट्रातील पुण्याच्या कनिष्क जैनला सुवर्ण पदक, मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या स्नेहिल झाला सुवर्ण पदक, मध्य प्रदेशमधील इंदूरच्या रिद्धेश अनंत बेंडाळेला सुवर्ण पदक, गुजरातच्या सुरतमधील आगम जिग्नेश शाहला रौप्य पदक आणि राजस्थानमधील कोटाच्या रजित गुप्ताला रौप्य पदक मिळाले.
भारतीय संघासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर प्रा. शितिकंठा दास, मुंबईतील डी. जी. रुपारेल महाविद्यालयाचे निवृत्त विनायक काटदरे आणि दोन वैज्ञानिक निरीक्षक मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉ. अमृता साधू आणि जर्मन रॉबर्ट बॉशचे डॉ. विवेक लोहानी उपस्थित होते.
देशनिहाय पदकांच्या यादीत भारत तैवान, जपान आणि रशिया (ऑलिंपियाडच्या ध्वजाखाली सहभागी) यांच्यासह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. अमेरिका ५ सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण कोरिया, चीन आणि हाँगकाँग यांनी प्रत्येकी ४ सुवर्ण आणि १ रौप्य पदकांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. ८७ देशांतील एकूण ४१५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. आणखी पाच देश निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते, ज्यामुळे ते आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीएचओंपैकी एक बनले.
आयपीएचओमध्ये भारताचा हा २६ वा सहभाग होता. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि निवडण्यासाठी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आहे.