नाशिक
श्रावण महिना सुरू झाला आहे आणि पहिल्याच सोमवारी शिवभक्तांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक नाशिक येथील त्र्यंबकराजाच्या ऑनलाइन देणगी दर्शन पास भाविकांना जादा किमतीने विक्री करत काळाबाजार करणाऱ्या पाच संशयितांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
या संशयितांनी आतापर्यंत १६४८ बनावट देणगी काढल्याचे निष्पन्न झाले असून सुमारे पाच हजार भाविकांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून देणगी दर्शन रांगेसाठी प्रत्येक व्यक्तीकडून २०० रुपये आकारले जातात.
दरम्यान, ऑनलाइन देणगी दर्शन पासचा काळाबाजार होत असल्याच्या भाविकांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेत त्र्यंबकेश्वर पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.