मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली

मुंबई उपनगरीय रेल्वेत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर आज न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हणणं मांडलं.

उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काही निरीक्षणांमुळे मकोका अंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी राज्यसरकारची मागणी त्यांनी न्यायालयासमोर मांडली. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींनी पुन्हा आत्मसमर्पण करावं अशी कोणतीही मागणी नसल्याचं त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थिगिती दिली. तसंच, या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट केले.

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली होती. या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने दिलेला २००६ च्या बॉम्बस्फोटांबाबत दिलेला निर्णय हा धक्कादायक आहे. खालच्या कोर्टाने वेगळा निर्णय दिला होता. एटीएसने आरोपी पकडले होते. पुरावे सादर केले होते. मी अजून संपूर्ण निर्णय वाचलेला नाही. तरीही माझं काही तज्ज्ञांशी या संदर्भात बोलणं झालं आहे. लवकरात लवकर आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि या निर्णयाला आव्हान देऊ. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

न्यायमूर्ती अनिल किलोर आणि एस. एम. चांडक यांच्या विशेष खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, “चार वर्षांच्या कालावधीनंतर साक्षीदार आरोपीला ओळखू शकले, हे अत्यंत असामान्य आहे. सरकारी वकिलांचे पुरावे दोषसिद्धीसाठी सुरक्षित नव्हते. याचबरोबर काही साक्षीदार सामायिक साक्षीदार असल्याचे आढळून आले, जे इतर अनेक प्रकरणांमध्येही साक्षीदार म्हणून हजर राहिले होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *