खा.डॉ.बच्छाव यांनी गढीवर घेतलेल्या ‘चहाचा’ काँग्रेसला बसणार आणखी एक ‘चटका’ ?

धुळे विशेष वृत्त

गढीवर जाऊन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे चहाचा घोट घेवून आलेले माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपात स्थिरस्थावर होत नाहीत, तोच खा.डॉ.शोभाताई बच्छाव यांनाही गढीवर उफाळणाऱ्या चहाचा मोह आवरता आला नाही. पण या भेटीत मंत्री जयकुमार रावल – खा.डॉ. बच्छाव यांनी  घेतलेल्या चहाचा आणखी एक चटका बसण्याची भीती तग धरून असलेल्या काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. 

खा.सौ.बच्छाव आणि पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या भेटीचे नक्की कारण बाहेर पडले नसले,तरी कुणाल पाटील यांनी अशाच भेटी नंतर केलेल्या भाजपा प्रवेशाचे उदाहरण राजकीय पाटलावर ताजे आहे.

स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा धुळे जिल्ह्यावर एकछत्री अंमल राहिला.
कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नंदुरबार जिल्हा स्वतंत्र अस्तित्वात आला तरी काँग्रेस मात्र जिल्ह्यात तग धरून राहिली.
केंद्रात भाजपाची सत्ता आली तरीही धुळे जिल्ह्यातून मात्र काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काँग्रेसचे हात बळकट ठेवण्याचा प्रयत्न केला.

नुकतीच झालेली धुळे लोकसभा मतदार संघाची निवडणूक हे त्याचे बोलके उदाहरण आहे. या मतदार संघात काँग्रेस नेते उमेदवार शोधत असतांना माजी आमदार कुणाल पाटील यांच्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील काही नावे त्यांच्या नजरे समोर होती.पण दरम्यान,त्याच काळात काँग्रेसचे कुणाल पाटील हे भाजपात प्रवेश करतील आणि भाजपाच्याच तिकिटावर लोकसभा निवडणूक लढतील असे अंदाज बांधले गेले.परंतु तसे झाले नाही.डॉ.शोभाताई बच्छाव यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळाले आणि त्यांनी उमेदवारी केली.

सर्वत्र भाजपाचाच बोलबाला सुरु असतांना धुळे लोकसभा मतदार संघातून मात्र भाजपावर मात करत काँग्रेसच्या डॉ.शोभाताई बच्छाव या निवडून आल्या. त्यांनी भाजपाचे माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव केला. धुळे तालुका विधानसभा मतदार संघात मात्र माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांचा भाजपा उमीदवाराकडून पराभव झाला. या निवडणुकीत डॉ.शोभाताई बच्छाव यांना सर्वाधिक मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातून मते मिळाली,धुळे शहरातल्या अल्पसंख्यांक भागातूनही त्यांनी मते घेतली.

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातून काँग्रेस भुईसपाट झाली,असे वाटत असतांना डॉ. शोभाताई बच्छाव यांचा झालेला विजय हा उरल्यासुरल्या निष्ठावान नेते कार्यकर्त्यांसाठी उत्साह वाढविणारा आणि नवे बळ देणारा ठरला. यामुळे काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण लोकसभा मतदार संघात वेगवेगळे कार्यक्रम रबावण्यात आले.जनसंपर्कासाठी धुळे शहरात खा.डॉ. बच्छाव यांचे कार्यालय उघडण्यात आले.यामुळे अल्पसंख्यांकांसाठी हक्काचा खासदार म्हणून साहजिकच डॉ.शोभाताई बच्छाव यांच्याकडे रतीब वाढला.
नाशिकमध्ये नगरसेवक ते महापौर आणि पुढे तत्कालीन मंत्री भाजपाचे डॉ. दौलतराव आहेर यांचा पराभव करणाऱ्या खा.डॉ.शोभाताई बच्छाव यांना मंत्रीपदही लाभले.

नाशिक जिल्हा बँकेवरही त्यांनी काम केल्याचा अनुभव आहे.खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या  आजवरच्या या राजकीय प्रवासात त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेली साथ मंत्री रावल आणि  खा.बच्छाव यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनिमित्त चर्चेत आली आहे.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष असतांना माजी आमदार कुणाल पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे दोंडाईचा येथील गढीवर जाऊन चहा घेतला आणि गढीकडील परतीच्या वाटेवर कालांतराने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ‘भाजपा हा जनकल्यानार्थ काम करणारा पक्ष असून आपणास या पक्षाचे नेतृत्व मान्य’ असल्याचे कुणाल पाटील प्रवेशावेळी म्हणाले. त्यांच्या या प्रवेशामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात असली तरी त्यांनी गेल्या तीन पिढ्यातील काँग्रेस निष्ठा संपुष्ठात आणली. कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाचा जिल्ह्यातील निष्ठावंतांना धक्का बसला.

दरम्यान,काँग्रेसला पुन्हा ताकद देण्यासाठी मेळावे आणि बैठका घेण्याचे ठरले.आहे ती जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नवे पदाधिकारी नेमावेत अशी मागणी सुरु झाली परंतु त्यालाही मुहूर्त सापडला नाही.ग्रामीण जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी तिकीट दिले नाही म्हणून लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती.

यानंतर सनेर यांनीही पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
काँग्रेस कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना ऐकेकाळी शेकडो शाखा असलेल्या काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नाही अशी आजची स्थिती आहे. यामुळे खा. शोभाताई बच्छाव यांनी घेतलेल्या गढीवरच्या चहाचा आणखी एक चटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज या भेटीमागे काढला जातो आहे.


“पालक मंत्र्यांची प्रकृती बरी नव्हती. आम्ही कामानिमित्त दोंडाईचा येथे गेलो होतो आणि ते मंत्री रावल यांना कळाले.यामुळे त्यांनी आम्हाला फोन करून चहा घेण्यासाठी बोलावले. ही भेट कुठल्याही राजकीय कारणाने झाली नाही. केवळ आपल्या जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांच्या प्रकृतीची चौकशी एवढेच कारण होते”

-खा.डॉ.शोभाताई  बच्छाव
(धुळे लोकसभा मतदार संघ)

===

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *