धुळे शहर
शहरातील मुंबई-आग्रा या मुख्य राष्ट्रीय महामार्गालगत अवधान शिवारात औद्योगिक वसाहत असून, हजारो कामगार, व्यापारी, उद्योजक रोज या महामार्गाने एमआयडीसीत ये-जा करतात. मात्र, या महामार्गावर विविध प्रकारच्या वाहनांची सतत मोठी वर्दळ राहत असल्याने अपघातांचे प्रमाणही मोठे आहे. यात अनेकदा कामगारांसह इतरांना आपला जीव गमवावा लागत आहे. शिवाय सातत्याने वाहतुकीची कोंडी होणे, वाद होणे नित्याचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर अवधान परिसरातील औद्योगिक वसाहतीपासून रावेर रस्त्यापर्यंत पूल बांधावा, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी गुरुवारी (ता. १७) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात आमदार अग्रवाल शहर विकासाशी निगडित विविध समस्या व मागण्यांबाबत अधिवेशनात लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा आदींद्वारे सभागृहाचे व सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. याच अनुषंगाने गुरुवारी (ता. १७) आमदार अग्रवाल यांनी शहरातील अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीतील कामगार, कर्मचारी, व्यापारी, उद्योजकांना येणाऱ्या समस्यांबाबत औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, की धुळे शहरातील अवधान शिवारात औद्योगिक वसाहत असून, तेथे जाण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. यातच या महामार्गावर सातत्याने विविध वाहनांची मोठी वर्दळ असते. यातून सातत्याने लहान-मोठे अपघातही घडतात. या अपघातांमध्ये औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगार, कर्मचारी, व्यापाऱ्यांसह अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याशिवाय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका एमआयडीसीतील उद्योगांनाही बसतो. यातून विविध समस्या निर्माण होत आहेत. अपुरा मार्ग, वाहतूक कोंडी आणि विलंब यामुळे स्थानिक उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर अवधान एमआयडीसीपासून रावेर रस्त्यापर्यंत नवीन पुलाचे बांधकाम करणे निकडीचे झाले आहे. औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या कामगार, कर्मचारी, व्यापारी, उद्योगकांना हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास केवळ वाहतुकीचाच प्रश्न सुटणार नाही, तर राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या सर्वच घटकांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासह औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या वाहनांच्या दळणवळणाची सोयही होईल. यातून औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या नवीन उद्योगांना ही सुविधा उपयुक्त ठरून औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. याबाबत औद्योगिक वसाहतीतील उद्योजक-व्यापाऱ्यांसह उद्योग मित्र समितीनेही वारंवार शासन-प्रशासनाकडे पूल बांधण्यासाठी मागणी केली आहे.
याबाबत शासनाने पुलाच्या कामासाठी योग्य ती पावले उचलावीत, प्रस्तावित पुलाच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली.