धुळ्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करावे  खासदार डॉ. शोभा बच्छावांची कृषी मंत्र्यांकडे मागणी 

धुळे जिल्हा
धुळे शहरातील कृषी महाविद्यालयाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यापासून विभाजन करून स्वतंत्र धुळे कृषी विद्यापीठ स्थापन करावे यासाठी खासदार बच्छाव यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सविस्तर निवेदन सादर केले. धुळ्यात लवकरच स्वतंत्र कृषी विद्यापीठ होईल असे आश्वासन यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनी दिले. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाव्दारे खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या वतीने देण्यात आली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात असलेल्या धुळे शहरामध्ये सुमारे ५०० एकर जागेवर धुळे कृषी महाविद्यालय असून सदरचे महाविद्यालय हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी याच्याशी संलग्न आहे. हे कृषी महाविद्यालय धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवण्याचे काम करत असून महाविद्यालयात बी.एस्सी. (कृषी) आणि एम.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रम शिकवले जातात. राहुरी कृषी विद्यापीठाचा विस्तार मोठा असल्याने त्यांना सर्वच जिल्हयात देखरेख ठेवणे, कारभारावर नियंत्रण ठेवणे कुलगुरूंसह प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असते. त्यामुळे धुळे शहरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ झाल्यास निश्चितपणे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार असून कृषी शिक्षण, कृषी संशोधन, कृषी विस्तार यांना चालना मिळणार आहे.
धुळे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र शेती व्यवसायावर अवलंबून असणारा मोठा शेतकरी वर्ग आहे. त्यांना देखील येथील तंत्रज्ञान व मार्गदर्शनाचा निश्चितच फायदा होणे सोपे ठरणार आहे. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि धुळे जिल्ह्यातील नागरिकही यासाठी सातत्याने आंदोलने करीत आहेत. ही मागणी कृषी मंत्र्यांसमोर मांडत असतांना खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी सर्व बाबी त्यांना समजावून सांगत स्वतंत्र कृषी विद्यापीठाचे महत्व पटवून दिले.
या बाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याशी सकारात्मक चर्चा करत धुळ्यात लवकरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ होईल असे  यांना आश्वासन दिले. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *