धुळ्यात बनावट साहित्य तयार करणार्‍यांवर पोलिसांचा छापा, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

 

धुळे जिल्हा

गृह निर्माणात उपयोगी येणार्‍या एका नामांकित कंपनीचे बॉटम आणि सिलिंग पटटीचे बनावटीकरण करणार्‍या कारखान्यावर छापा घालून धुळे पोलीसांनी तीन लाख ७७ हजार ३४० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. आज गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

यासंदर्भात पुणे येथील व्यावसायीक सर्फराज अब्दुल रऊफ तांबोळी,रा.कसबा पेठ यांनी धुळ्यातील चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादित म्हटल्या नुसार, त्यांच्या सेंट गोबीन इंडिया प्रा.लि. मुंबई या कंपनीने विकसित केलेल्या डिझाईन, पॅटर्न प्रमाणे सिलींग पटटया आणि बॉटम पटटया प्रमाणे दिसणारे बनावट उत्पादन धुळे शहरात तयार केले जाते. स्वतःच्या फायदयासाठी या उत्पादनाची विक्री करण्याच्या उददेशाने मोठ्या प्रमाणात त्याचा साठाही केला जातो. धुळे शहरातील शंभर फुटी रोडवरील स्मार्ट स्टिल नावाच्या कारखान्यात तयार होत असल्याचे या फिर्यादित नमूद करण्यात आले.

यावरून पोलिसांनी दोन पंचांसह गुरुवारी घटनास्थळी धाव घेतली आणि स्मार्ट स्टिल, शंभर फुटी रोड, तसेच मुंबई-आग्रा महामार्गाजवळील गोल्डन पार्क शेजारी असलेल्या एका गोदामावर छापा घातला. यावेळी दुकान आणि गोदाम मालक मुख्तार खान शहजाद खान, रा. गरीब नवाज नगर, धुळे याच्याकडून पोलिसांनी संशयास्पद उत्पादनातील साहित्य ताब्यात घेतले. यात सहा नग सिलिंग पटटया बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी डाय, ६०० नग एलपटटी, दोन सिलिंग बॉटम पटटया आणि एलपटटी उत्पादन करणारे यंत्र, १२ नग स्टीलच्या बॉटम पटटया, १५० नग सिलिंग पटटया आणि २० नग पॅरामिटर पटटया असा तीन लाख ७७ हजार ३४० रुपये किंमतीच्या मुददेमालाचा समावेश आहे.

दुकान आणि गोदामाचे मालक मुख्तार खान शहजाद खान यांनी नामांकित कंपनीचे उत्पादन बनावट पध्दतीने तयार करुन त्याव्दारे सेंट गोबीन इंडिया प्रा.लि. या कंपनीची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाल्याने मुख्तार खान शहजाद खान यांच्या विरोधात चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक हरीश्चंद्र पाटील, अविनाश वाघ, रमाकांत पवार, शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, निलेश चव्हाण, संदीप वाघ, सुर्यकांत भामरे, धिरज सांगळे व राकेश मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *