प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सूरज जगताप

धुळे जिल्हा

ग्रामीण भागात शाश्वत स्वयंरोजगार निर्माण व्हावा व आत्मनिर्भर व्हावा, यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या योजनेंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या निकषात बदल करण्यात आल्याने अन्न प्रक्रीया क्षेत्रातील इतर उद्योगांनाही अनुदानाचा लाभ मिळत आहे. लाभार्थ्यांना प्रकल्प किंमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. सन 2020-2021 पासून जिल्ह्यात योजनेची अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 556 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात (2025-2026) 50 नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

एक जिल्हा एक उत्पादन व्यतिरिक्त नवीन उद्योग व कार्यरत उद्योगांचे विस्तारीकरण व स्तर वृध्दी करण्यावर भर दिला जात आहे. विविध कृषी उत्पादनांवर आधारित उद्योगांना चालना देत आहे. त्यामध्ये फळे, भाजीपाला, अन्नधान्य, मसाले, कडधान्य, दुग्ध उत्पादने, बेकरी, स्नॅक्स इत्यादींचा समावेश आहे. यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेचा आधार घेऊन जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल, त्यानुसार सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उभारता येतो. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/ संस्था/ कंपनी / स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनाचे ब्रेडींग आणि मार्केटींग अधिक बळकट करण्यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे.

जिल्ह्यात सध्या केळी, पपई, तांदूळ, डाळ यासारख्या शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारे राईसमिल, डालमिल, फळ प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. काही उद्योग क्लस्टरच्या माध्यमातून स्थापन झाले असून त्यामार्फत मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उलाढाल होत आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक, भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट, स्वयंसहायता गट आदी पात्र आहेत. प्रकल्पासाठी किमान 10 टक्के रक्कम लाभार्थ्यांनी गुंतवायची असून उर्वरित रक्कम बँकांकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांनाची योग्य छाननी करुन बँक कर्जाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *