धुळे जिल्हा
शहरातील स्वच्छता आणि साफसफाईची कामे देतांना पारंपारिकरित्या स्वच्छतेत योगदान देणाऱ्या वाल्मिकी, मेहतर समाजाच्या नोंदणीकृत संस्थांना प्राधान्य देण्यात यावेत. अशा सूचना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सातपुडा सभागृहात राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष श्री. सारवान यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संजय सैंदाणे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजित बाविस्कर, नागेश कंडारे, विजय पवार, सुभाष जावडेकर यांच्यासह महापालिका, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री. सारवान म्हणाले की, जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद, नगर पंचायती मध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी. जिल्ह्यात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे सर्व्हेक्षण करावे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात सफाई कामगारांना सुट्टीच्या दिवशी कामाचा मोबदला देण्यात यावा. सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. शहरातील स्वच्छता आणि साफसफाईच्या कामांमध्ये वाल्मिकी मेहतर समाजाच्या नोंदणीकृत संस्थांना प्राधान्य देण्यात यावेत. समाजाच्या लोकांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच या समाजाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
बैठकीत हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध व पुनर्वसन अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुरक्षित कार्य, वातावरण, वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, शासकीय योजनांची अंमलबजावणी व कायम नियुक्तीसंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.