शासनाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त व्याजदराची आकारणी करणाऱ्या सावकाराची तक्रार दाखल करावी – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते
बेकायदेशीर सावकारांनी खरेदी केलेल्या जमिनीचे दोन व्यवहार केले रद्द
धुळे जिल्हा
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये परवानाधारक सावकारांनी शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदराची आकारणी केल्यास अशा सावकारांची तक्रार दाखल करावी. तसेच बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्यांची गोपनीय तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.
शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 ची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी गठीत समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. शासनाने 1 मार्च, 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीत जिल्हा पोलीस अधिक्षक, धुळे सदस्य असून सदस्य सचिव म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे हे आहेत.
धुळे जिल्ह्यात एकूण 17 परवानाधारक सावकार आहेत. त्यापैकी धुळे तालुक्यात 9, साक्री तालुक्यात 8 परवानाधारक सावकार आहेत. परवानाधारक सावकारांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट् राज्य, पुणे यांचेकडील 2 जून, 2025 रोजीच्या परिपत्रकान्वये व्याजाचे दर व्यवसायाचे ठिकाणी दर्शनी भागात ठळकपणे लावणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतक-यांकरिता तारण कर्जासाठी 9 टक्के प्रतिवर्षी इतका अधिकतम व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. तर विनातारण कर्जासाठी 12 टक्के प्रतिवर्षी इतका अधिकतम व्याजदर आहे. त्याचप्रमाणे शेतक-यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिलेल्या तारण कर्जासाठी 15 टक्के प्रतिवर्षी इतका अधिकतम व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. तर विनातारण कर्जासाठी 18 टक्के प्रतिवर्षी इतका अधिकतम व्याजदर आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये जी व्यक्ती बेकायदेशीर सावकारी करीत असेल त्याबाबत आवश्यक त्या पुराव्यासह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांचेकडे गोपनिय तक्रार दाखल करावी. तसेच परवानाधारक सावकार हे शासनाने ठरवून दिलेल्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज कर्जदार यांच्याकडून घेत असल्यास त्याबाबतही तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांचेकडे दाखल करु शकतात. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. चौधरी यांनी बैठकीत दिली.
तसेच कर्जदाराच्या अर्जावरुन किंवा अन्यरितीने, जर पडताळणीच्या किंवा तपासणीच्या दिनांकापासून अथवा कर्जदाराचा अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून (पंधरा वर्षांच्या आत) विक्री गहाण, भाडेपट्टा, विनियम या रुपाने किंवा अन्य रुपाने सावकाराच्या कब्जात येणे अभिप्रेत असलेली कोणतीही स्थावर मालमत्ता ही, सावकारीच्या ओघात सावकाराने दिलेल्या कर्जाबद्दल कर्जदाराने सावकाराला प्रतिभूती म्हणून दिलेल्या मालमत्तेच्या स्वरुपाची आहे. अशा कर्जदारांनी आवश्यक त्या पुराव्यासह महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 18 अन्वये प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांचे कार्यालयात दाखल करावे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 18 अन्वये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांनी बेकायदेशीर सावकार यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे दोन व्यवहार रद्द करण्याबाबतची कार्यवाही केल्याची माहितीही श्री. चौधरी यांनी दिली.