एलसीबी पथकाचा भेसळखोरांना दणका २५० किलो पनिर जप्त, अन्न औषध विभागाकडून तपासणी

धुळे

Dhule Lcb raids paneer धुळे शहरातील अवधान औद्योगिक वसाहतीमधील एम ब्लॉक मध्ये असलेल्या शौर्य डेअरीवर आज पहाटे ६ वाजेला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा घालून भेसळयुक्त असल्याच्या २५० किलो पनिर हस्तगत केेले.

यावेळी पोलीसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना सोबत घेवून ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या अधिपत्त्याखालील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत साधारणपणे ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


या डेअरीमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संदीप देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी आढळून आलेले २५० किलो पनीर हे नैसर्गिक पद्धतीने बनविण्यात आलेले नाही, असा संशय आहे.

विशिष्ट पद्धतीचे घटक वापरून हे पनीर अनैसर्गिक पद्धतीने उत्पादीत करण्यात आल्याच्या संशयावरून कारवाई करीत आहोत. या उद्योगासाठी लागणार्‍या खाद्य पदार्थाचा परवाना आढळून आलेला नसून संबंधीतांनी खाद्य परवान्यासाठी अर्ज केला होता.

तथापि कागदपत्रांच्या पूर्तते अभावी संबंधीतांचा अर्ज यापूर्वी नामंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष जाधव, शाम निकम, हेकॉ दिनेश परदेशी, सुरेश भालेराव,

कैलास महाजन, अमोल जाधव, किशोर पाटील, संदीप पाटील, नितीन दिवसे, योगेश जगताप व मायूस सोनवणे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, अमित पाटील यांनी ही कारवाई पूर्ण केली आहे.

या शौर्य डेअरीच्या उद्योगात उत्तर प्रदेशातील तीन मजूर काम करतांना आढळले असून ही डेअरी कैलास गवळी, सोमनाथ गवळी, सुहास गवळी यांच्या भागीदारीतून चालविण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे.

याची प्रत्यक्ष खातरजमा करण्याचे काम पोलीस प्रशासनाने हाती घेतले आहे. गेल्या दोन महिन्यापासून हा उद्योग चालू असावा असा संशय यावेळी करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *