धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आढळलेल्या कोट्यावधींच्या रोकड प्रकरणी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

 

धुळे जिल्हा

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेण्यात आलेल्या एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांच्या रोकड प्रकरणी अखेर खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधीमंडळ अंदाज समितीच्या धुळे जिल्हा दौर्‍यावेळी येथील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत कोट्यावधींची रोकड मिळून आली होती.

पोलिसांनी या प्रकरणी जाणीवपूर्वक अदखलपात्र गुन्हा दाखल केला असा आरोप शिवसेनेचे (उबाठा) नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. यानंतर माजी आमदार गोटे यांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयात दाद मागत माजी आमदार अनिल गोटे यांनी खंडणीच्या कलमासह दखलपात्र गुन्हा दाखल करावा,अशी मागणी केली. ती गुरुवारी मान्य झाली आणि त्यानुसार अखेर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अनिल उमराव गोटे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, १५ ते २१ मे रोजी रात्री साडेदहा वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. किशोर काशिनाथ पाटील रा.पिंपरखेड बु.ता.घनसावंगी जि. जालना आणि राजकुमार व्यंकटराव मोगले रा. शेरखान गल्ली साठे नगर,मेन रोड उदगीर जि.लातूर यांनी आर्थिक फायद्यासाठी फौजदारीपात्र कटकारस्थान एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये धुळे जिल्हयातील निरनिराळया विभागाच्या शासकीय अधिका-यांना फोन करुन धाकदपटशा दाखवुन किंवा धमकी दाखवुन खंडणीच्या स्वरुपात गोळा केले. ही रक्कंम एम.एच. ४१ पासिंग असलेल्या पझोरो गाडी मध्ये तसेच इनोव्हा गाडीतुन हलवली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय, हॉटेल कृष्णाई आणि हॉटेल मानस या ठिकाणाचे सिसिटीव्ही चित्रीकरण हेतुत: जाणुन बुजुन नष्ट केले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयात केलेल्या अर्जावरुन पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८,६१ (२), २३३, २३८, २३९,२४०,२४१, २४९ नुसार दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *