धुळे
धुळ्यातील स्वस्तिक चित्रपट गृह जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करीत नगर भूमापन कार्यालयाच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर व लिपिक अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांनाही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
दस्तावेजात वारसांची बेकायदेशिरपणे नोंद आणि बनावट नकाशाचा वापर करुन येथील मालमत्ता खरेदी खताद्वारे विकण्यात आल्याचे आरोप फिर्यादीनी केला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, धुळे शहरात स्वस्तिक चित्रपट गृह (सिटी सर्व्हे क्र. १४६६) मालमत्तेच्या दस्ताऐवजावर नगर भूमापन कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन संगनमताने हिरालाल मोतीलाल शाह यांच्या नावास कंस असतांना तो काढून प्रदीप हिरालाल शाह यांना कारणापुरता उतारा देण्यात आला.या उताऱ्यावरून प्रदीप हिरालाल शाह यांनी या मालमत्तेवर हक्क व अधिकार नसतांना वारसांची बेकायदेशिरपणे नोंद घेतली.
स्वस्तिक चित्रपट गृह (सिटी सर्व्हे मालमत्ता क्रमांक १४६६/४ व १४६६/५) व क्षेत्राचे वर्णन आणि चतुसिमा टाकून (सि.स.नं.१४६६/१) मधीलच क्षेत्र आहे, असे दर्शवण्यात आले.यासाठी बनावट नकाशाचा वापर करण्यात आणि खरेदी खताद्वारे ही मालमत्ता विक्री केल्याचे उघडकीस आले आहे.
या गुन्हयाचा पोलिसांनी तपास केला असता मालमत्तेचा बनावट नकाशा तयार करणारे,बनावट मालमत्ता पत्रक बनवून देणारे नगर भुमापन कार्यालयातील चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
यात डाटा एन्ट्री ऑपरेटर आनंद दिगंबर मोरे, परिरक्षण भुमापक धमेंद्र प्रभाकर खंबाईत, प्रमुख लिपीक देवेंद्र सदाशिव टोपे व नगर भुमापन लिपीक धिरज रमेश बोरसे यांचा समावेश आहे.
या सर्वांविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या कालमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक विश्वजीत जाधव हे करीत असून ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे अमोल देवढे, सविता गंवादे,रविंद्र माळी, श्रीकांत पाटील,प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार व विलास पाटील यांच्या पथकाने केली.