मुंबई
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी बांधवांसाठी आवश्यक सुविधा व निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी, या साठी धुळे जिल्ह्यातील येथील दोंडाईचा व शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” योजनेअंतर्गत शेतकरी भवन बांधकामास मंजूरी देण्यात आली आहे, तसेच असंघटित व संघटित कामगारांना एकाच छताखाली शासकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने धुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामगार भवन उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना ही कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निवास व मूलभूत सुविधा एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. योजनेअंतर्गत ज्या बाजार समित्यांमध्ये अद्याप शेतकरी भवन नाही, तेथे नव्याने बांधकामास मान्यता देण्यात येत आहे. याच अनुषंगाने दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी भवनासाठी १६६.९८ लक्ष रुपये, तर शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी भवनासाठी १५३.०५ लक्ष रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व सुविधायुक्त भव्य शेतकरी भवन निर्माण होणार आहे.
तसेच, धुळे जिल्ह्यातील संघटित व असंघटित कामगार कामगार बांधवांसाठी सर्व सुविधा युक्त कामगार भवन निर्माण व्हावे व त्यांना सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यादृष्टीने जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामगार भवनाच्या उभारणीसाठी १४ कोटी ७१ लक्ष रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच कामास सुरुवात होणार असून सर्व सुविधायुक्त व सुसज्ज कामगार भवन बांधले जाणार आहे. या कामगार भवनात कामगार विभागाशी संबंधित सर्व कार्यालये एकत्रित करण्यात येणार असून, असंघटित व संघटित कामगारांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.