धुळे जिल्हा
धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातुन मोटार सायकल चोरी करणार्या टोळीस धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार लाख ९० हजार रुपये किमतीच्या १३ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्हयातुन चोरीस गेलेल्या मोटर सायकलचा शोध घेवून कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना दिल्यानंतर लगेचच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथक स्थापन करून गुप्त पद्धतीने माहिती काढली.
तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी धुळे शहरातील वडजाईरोडवर असलेल्या व्हीआयपी लॉन्स जवळुन सलमान सागीर सैय्यद (वय-२६ वर्ष) रा.शंभर फुटी रोड जामचा मळा, धुळे. तसेच मोटार सायकल दुरुस्ती करणारा कारागीर अकीब उर्फ बाबा शेख जैनोद्दीन (वय-३६वर्ष) रा.चिराग गल्ली, नंदुरबार जि. नंदुरबार आणि वसीम कलीम शेख, वय-३० वर्ष) रा.काली मशीद जवळ,नंदुरबार यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता, त्यांनी लपवून ठेवलेल्या आणि वापरात असलेल्या जवळपास १३ मोटार सायकल पोलिसांना काढून दिल्या. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्यांची किंमत चार लाख ९० हजार रुपये आहे. या मोटार सायकल वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या नऊ गुन्ह्यांतल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, प्रकाश पाटील, पोलीस अंमलदार संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण व प्रल्हाद वाघ यांनी केली अशी माहिती देण्यात आली आहे.