उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचा धुळ्यात छापा ;  रहिवाशी इमारतीत थाटलेला बनावट मद्य निर्मितीचा अड्डा उध्वस्त..!

 

धुळे जिल्हा

धुळे शहरातील सुशिक्षीत नागरीकांच्या वसाहतीत थेट बनावट मद्य निर्मितीचा कारखाना थाटून बेकायदेशीरपणे देशी विदेशी बनावटीची नकली दारु तयार करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून उघड केला. दि. १ जुलैला रात्री ही कारवाई करण्यात आली. यात ३ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्रीमती यु.आर. वर्मा मॅडम, धुळे अधिक्षक व्ही.टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशन काळात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरातील अरुणकुमार वैद्यनगर, प्लॉट नं. ५४, गणराज अपार्टमेंट, फ्लँट नं. ६, साक्री रोड धुळे येथे छापा टाकला. या ठिकाणी जेतेंद्र शेवाराम टेकवाणी (वय ४३) हा बेकायदेशीरपणे बनावट देशी विदेशी मद्याची निर्मिती करुन ती खुल्या बाजारात विक्री करीत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी तयार विदेशी ब्लेंड, व बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ३ लाख ३९ हजार ७२५ रुपयांचा मुदद्ेमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जेतेंद्र टेकवाणी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक बी.व्ही. हिप्परगेकर, आर.आर. धनवटे, अनिल बी. निकुंबे, जितेंद्र फुलपगारे, सहा.दुय्यम निरीक्षक तसेच जवान मयूर मोरे, बाळकृष्ण सोनवणे, मनोज धुळेकर, कल्पेश शेलार, दारासिंग पावरा, गौरव सपके, नितीन पाटील, वाहन चालक व्ही.बी. नाहीदे यांच्या पथकाने केली आहे.

अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक संबंधित कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्रि क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉटस ऍप क्र. ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
असे आवाहन देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी.व्ही. हिप्पेरगेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *