कृषि दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील आदर्श शेतकर्‍यांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते गौरव

 

धुळे जिल्हा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिन कार्यक्रमात आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील आदर्श शेतकर्‍यांचा गौरव करत कृषि दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग, जिल्हा परिषद धुळे, प्रकल्प संचालक (आत्मा), पंचायत समिती धुळे आणि कृषि महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.

याप्रसंगी धुळे जिल्ह्यातील महेश पाटील, समाधान गर्दे, गिरीष देवरे, वासुदेव भिल, चंद्रकांत भदाणे, जिजाबराव पाटील, काशिनाथ पाटील, वसंत पावरा, सयाजी पाटील, राण्या कुवर, अर्जुन तोरवणे, श्रीमती भारतीबाई खैरनार या शेतकर्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र आणि पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. तसेच खरीप हंगाम पिक स्पर्धेत विजेत्या शेतकर्‍यांचाही सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमांस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जि.प.कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर, प्रकल्प संचालक (आत्मा) हितेंद्र सोनवणे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.देसले, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सिताराम चौधरी, कृषि विद्यान केंन्द्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.दिनेश नांद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, गट विकास अधिकारी गणेश चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीला अभिवादन करत सर्व शेतकर्‍यांना कृषि दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नरवाडे म्हणाले की, देशातील सुमारे ५० टक्के नागरिक शेतीशी संबंधित आहेत. शेतीसह पूरक व्यवसायातूनही शेतकरी अर्थकारणात मोठे योगदान देतात. हवामान, पावसाच्या अंदाजांसाठी व योजनांच्या माहितीकरिता कृषि विभागाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अधिक उत्पादनासाठी नियमित माती परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शाश्वत शेतीसाठी नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प संचालक (आत्मा) हितेंद्र सोनवणे यांनी जागतिक तापमानवाढ आणि शेतीवरील परिणाम या विषयावर तर डॉ. दिनेश नांद्रे यांनी वातावरणीय बदल व पीक पद्धतीतील बदल यावर मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी सिताराम चौधरी यांनी, सूत्रसंचालन कृषि विस्तार अधिकारी डॉ. तुषार तिवारी यांनी, तर आभार प्रदर्शन जिल्हा कृषि अधिकारी भास्कर जाधव यांनी केले. या कार्यकमांस मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *