शिबिरात महसूल विभागाकडून विविध योजनांचे प्रमाणपत्र वितरण
धुळे जिल्हा
शिरपूर तालुक्यातील करवंद परिमंडळ अंतर्गत मौजे मांडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात महसूल विभागाच्यावतीने नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार महेश साळुंखे, पुरवठा निरीक्षक श्री. ठाकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य यतीश सोनवणे, माजी सरपंच सुनील सोनवणे तसेच करवंद व मांडळ परिमंडळातील तलाठी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
आमदार काशिराम पावरा म्हणाले, शिरपूर तालुका हा प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवणारा एकमेव तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य शासन नागरिकांसाठी लोकहिताच्या अनेक योजना राबवत आहे. तालुक्यातील जनतेने शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व विद्यार्थी यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे मंजुरी आदेश, मोफत वाळू वाहतूक परवाने व जिवंत सातबारा उतारे अशा महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात लाभार्थी व ग्रामस्थांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ सेवा मिळाल्यामुळे नागरिकांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी करवंद मंडळातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मांडळ ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले.