धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावा विषयी आज आयोजित विशेष सभेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहन कुवर हे गैरहजर राहिल्याने प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन केले. यामुळे राजकिय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
साक्री नगरपंचायतमध्ये १७ पैकी ११ नरगसेवक भाजपाचे निवडून आल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. मात्र, नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या कारभाराने नाराज झालेल्या सहा नगरसेवकांनी तीन वर्षानंतर नाराजी व्यक्त करत अविश्वास ठराव आणण्याचा हालचाली चालविल्या होत्या. त्यास विरोधक सदस्यांचे पाठबळ मिळाल्याने अखेर १८ जून २०२५ रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल दाखल करण्यात आला होता.
त्यावर आज 25 रोजी सकाळी ११ वाजता येथील नगरपंचायतीच्या सभागृहात चर्चा आणि मतदान होणार होते. परंतु, दुपारी १२ वाजले तरी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहन कुवर हे बैठकीस आले नाहीत. त्यांच्याऐवजी तहसीलदार साहेबराव सोनवणे हे येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, १ वाजेपर्यंत त्यांचाही पत्ता नव्हता. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगराध्यक्षांसह पाच सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. तर विरोधकांनी तेथेच ठाण मांडत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त केला. तसेच अधिकारी जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाहीत, अशी भुमिका घेतली होती. तर शिवसेनेचे नगरसेवक पंकज मराठे यांनी अधिकाऱ्यांची मनमानी चालू देणार नसल्याचे सांगत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. या सर्व घडमोडींमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी दुपारी उशीरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे हे देखील दाखल झाले होते.
दरम्यान, साक्री नगरपंचायतमध्ये झालेल्या प्रकारावर जाब विचारण्यासाठी साक्रीच्या शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावीत या सांयकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या मात्र जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची भेट न मिळाल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाहिऱ्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने कोणाच्यातरी दबावाखाली आज साक्री नगरपंचायतची अविश्वास सभा होऊ दिली नाही. असा आरोप आमदार मंजुळा गावीत यांनी केला.