नवी दिल्ली
प्रसिद्ध बिंदूचित्र (स्टीपलिंग) कलाकार शैलेंद्र खैरनार यांनी नुकतीच महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान खैरनार यांनी हॉकीचे जादूगार ध्यानचंद आणि त्यांच्या पुत्राचे उत्कृष्ट बिंदूचित्र श्रीमती विमला यांना भेट दिले.
धुळे जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले शैलेंद्र खैरनार हे गेली तीन दशके बिंदूचित्रकलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नावाजले गेले आहेत. पुणे विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या खैरनार यांनी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ चिकाटी, समर्पण आणि कल्पकतेच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
खैरनार यांनी आजवर भारतरत्न सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, राजीव गांधी, सोनिया गांधी, मदर टेरेसा, तसेच आंतरराष्ट्रीय दिग्गज बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन, पेले, मॅराडोना, झिको यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची बिंदूचित्रे साकारली आहेत. यातील अनेकांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांची चित्रे हस्तांतरित केली आहेत.
खैरनार यांची कलाकृती भारतासह अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, स्पेन, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, जमैका व त्रिनिदाद-टोबॅगो अशा एकूण 13 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाली आहे. 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान लंडनच्या नेहरू सेंटर येथे त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते झाले होते.
खैरनार यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दोन वेळा पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असून हे नामांकन जळगाव जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारतर्फे सादर करण्यात आले होते.
बिंदूचित्रकलेसाठी लागणारी एकाग्रता, संयम आणि कौशल्य यांचे दर्शन खैरनार यांच्या प्रत्येक चित्रातून होते. एक चित्र पूर्ण करण्यासाठी त्यांना किमान एक ते दोन दिवसांचा वेळ लागतो. डिजिटल युगातही त्यांनी या पारंपरिक शैलीला नवसंजीवनी दिली आहे.
आजवर आठ देशांची भ्रमंती करणारे खैरनार यांचे पाय मात्र आजही जमिनीवर आहेत. भुसावळचा मराठमोळा हा कलाकार प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या चित्रांच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतो आहे.