१४ लिफ्टसह ट्रान्स्फार्मर, पथदीप, हायमास्ट दिवे, जनरेटर होणार उपलब्ध ; आमदार अग्रवाल यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री मुश्रीफ यांचे आभार
धुळे जिल्हा
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील फायर व इलेक्ट्रिकल ऑडिटच्या अनुषंगाने संस्थेतील लिफ्ट दुरुस्तीच्या कामांसह वीज विभागाशी संबंधित विविध कामांसाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्येमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा कोटी ६१ लाख पाच हजार ५७० रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या निधीमुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विविध इमारतींमधील लिफ्टसह विजेशी संबंधित विविध कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी मंजूर केल्याने आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले.
विविध कामांचा दिला होता प्रस्ताव
येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारत क्रमांक एक व दोनमधील विविध विभागांतील १४ लिफ्ट बंद पडल्या होत्या. यात बिल्डिंग क्रमांक एकमधील एक ते सात क्रमांकांच्या लिफ्टसाठी तसेच बिल्डिंग क्रमांक दोनमधील अन्य सात लिफ्टच्या दुरुस्तीसह त्या बदलणे व मोटाराइज्ड हायमास्ट दिवे बसविणे, सोलर हायमास्ट दिवे बसविणे, वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये पथदीप बसविणे, जनरेटर सेट बसविणे, तसेच वाढीव क्षमतेचे ट्रान्स्फार्मर बसविणे आदी कामांसाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्याबाबत आमदार अग्रवाल यांनी तसा प्रस्ताव तयार करून घेत तो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे दिला होता. या मागणीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार या सर्व कामांसाठी सहा कोटी ६१ लाखांहून अधिक निधी मंजूर झाला आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
विविध कामांमुळे होणार सोयी-सुविधा
मंजूर झालेल्या निधीतून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारत क्रमांक एकमधील नाक-कान-घसा विभागातील तुटलेल्या व कार्यान्वित नसलेल्या सात लिफ्टच्या दुरुस्तीसह नवीन लिफ्टसाठी एक कोटी ७४ लाख १४ हजार ९१७ रुपये, इमारत क्रमांक दोनमधील सात लिफ्टसाठी एक कोटी ८२ लाख २१ हजार ७१९ रुपये, वैद्यकीय महाविद्यालय आवारात मोटोराइज्ड हायमास्ट दिव्यांसाठी २४ लाख ९९ हजार ४५२ रुपये, २५० केव्ही क्षमतेच्या ट्रान्स्फार्मरसाठी ३३ लाख नऊ हजार ५५५ रुपये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सोलर हायमास्ट दिव्यांसाठी ४९ लाख ६० हजार ७६८ रुपये, कॅम्पसमध्ये पथदिव्यांसाठी २४ लाख ९९ हजार ७५२ रुपये, शवविच्छेदन गृहासाठी जनरेटर उपलब्ध करण्यासाठी १७ लाख ६० हजार ९२४ रुपये, वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत क्रमांक एक व दोनमध्ये फायर अलार्म सिस्टिम बसविण्यासाठी एक कोटी आठ लाख ८६ हजार ८५६ रुपये, इमारत क्रमांक दोनमधील शस्रक्रियागृहासाठी वाढीव क्षमतेचा ट्रान्स्फार्मर बसविण्यासाठी ५३ लाख ५१ हजार ६२६ रुपये असे एकूण सहा कोटी ६१ लाख पाच हजार ५७० रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
“धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बंद पडलेल्या लिफ्ट बदलण्यासह विद्युतीकरणाच्या विविध कामांसाठी निधीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दिला होता. निधीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने तब्बल सहा कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. येत्या महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यानुसार ही कामे पूर्ण होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांसह सर्वांची सोय होणार आहे. हा निधी मंजूर केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानतो.”
–अनुप अग्रवाल, आमदार, धुळे शहर