धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बाजार समिती संचालकांची एक दिवसीय पणनविषयक कार्यशाळा संपन्न

 

धुळे जिल्हा

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्याकरिता एकदिवसीय पणनविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत एकूण 105 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून तसेच कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व संचालक, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील कार्यशाळा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवीन संचालक मंडळ कार्यरत झालेले आहे. नूतन संचालकांना बाजार समितीचे कामकाज करीत असताना कलम 37 अन्वये बाजार फी चा उपयोग, बाजार समिती गुणांकन पद्धती, बाजार समितीच्या पायाभूत सुविधांकरिता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, बाजार समिती कार्यक्षेत्रातील कृषी उत्पादने व नियमन, कृषी पणन मंडळाच्या विविध योजना, बाजार समित्यांना असलेली खाजगी क्षेत्रातील आव्हाने व उपाय योजना अशा विविध विषयासंबंधी कार्यशाळेमध्ये तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यशाळेमध्ये बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीसाठी, प्रगतीसाठी व उन्नतीसाठी शासनाच्या विविध उपक्रमांचा व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नारायण पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ, पुणे तथा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दोडांईचा व शिवपुरी पुरी, उपसरव्यवस्थापक, विभागीय कार्यालय, कृषी पणन मंडळ, नाशिक यांनी आवाहन केले व उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

सदर कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप, डीएमआय कार्यालयाचे बुद्धी विलास, कृषी पणन मंडळ कार्यालयाचे बहादुर देशमुख, नारायण टापसे,दीपक साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदरील कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सुधीर वाघ, दीपक साळुंखे , नितीन शेवाळे यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *