अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यावर धुळ्यात प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 धुळे जिल्हा
 अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आज धुळे येथे संपन्न झाली.
  पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश प्रविण कुलकर्णी, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मानसिंग पावरा, अभियोग संचालनायलाचे अतिरिक्त संचालक ॲड. बी. डी. भोईटे, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकिल ॲड.गणेश पाटील, तज्ञ व्याख्याता सुभाष केकाण, विधीतज्ञ ॲड. गायत्री वाणी, सहायक लोक अभिरक्षक ॲड. भाग्यश्री वाघ, रमेश श्रीखंडे आदि उपस्थित होते.
  न्यायाधीश प्रविण कुलकर्णी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा जलदगतीने निकाल लागण्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची, तसेच हे खटले चालविण्यासाठी विशेष सहायक सरकारी वकीलाची नियुक्ती करण्याची तरतुद  आहे. ज्या पक्षकारावर अन्याय झाला आहे त्याला गुणवत्तेवर न्याय मिळाला पाहिजे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. पीडितांना मोफत सल्ला देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारीत अधिनियम 2016 कायद्याच्या तरतुदींचा प्रभाव समाजात मोठया प्रमाणावर असून या कायद्याचा वचक सामाजिक तत्वावर राहावा म्हणून या कायद्याच्या तरतुदींची सक्तपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात जाती-जातीमधील दूरी कमी करण्यात आपण जर यशस्वी झालो तर या कायद्याचा उद्देश सफल होईल असे त्यांनी सांगितले.
  कार्यशाळेस अभियोग संचालनालयाचे अतिरिक्त संचालक ॲड. भोईटे तसेच तज्ञ व्याख्याते सुभाष केकाण यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
  यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवासी शाळेतील शुभांगी रुपनर, नेहा बाचकर, कावेरी पालवी, विकास साळवे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी केले, तर बार्टीचे नितीन सहारे यांनी आभार मानले. कार्यशाळेस अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, समता दूत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *