अक्कलपाडा धरणाच्या वाढीव जमीन अधिग्रहणास मंजूरी  खा.डॉ.शोभा बच्छावांच्या मागणीनुसार जलसंपदा मंत्र्यांचे आदेश 

धुळे जिल्हा
 अक्कलपाडा प्रकल्पासाठी (भाग-२) जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करावी असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित विभागाला दिले. यामुळे भविष्यात अक्कलपाडा धरण १००% भरणार आहे. खा.डॉ. शोभाताई बच्छाव यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले. आहे,की अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा.डॉ.शोभा बच्छाव यांनी धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अर्थातच तापी जलवाहिनी,अक्कलपाडा धरण (भाग-२) आणि शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान असलेल्या  प्रकाशा- बुराई योजना आणि धुळे लोकसभा मतदार संघातील अन्य प्रश्न संसदेत मांडले. याशिवाय जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही खा. डॉ.शोभा बच्छाव यांनी अक्कलपाडा धरण १००% भरण्यासंदर्भात काही आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मुंबईत आढाव बैठक झाली. धुळे पाटबंधारे विभाग, सिंचन भवन आणि महानगरपालिका यासारख्या सर्वच विभागाचा आढावा घेण्यात आला.तत्पूर्वी महानगरपालिका अंतर्गत जीर्ण झालेली  तापी जलवाहिनी, अक्कलपाडा (भाग २) आणि प्रकाशा- बुराई योजना या सर्व प्रकल्पांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे आणि धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांना  देण्यात आल्या होत्या. संबंधित अधिकार्‍यांनी आपापले प्रस्ताव वेळीच सादर केले आणि खा.शोभाताई बच्छाव या सगळ्या प्रस्तावांसह मुंबई येथे रवाना झाल्या होत्या.
मंत्री  गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे प्रस्ताव सादर करण्यात आले.यावेळी खा. शोभा बच्छाव यांनी लोकसभा मतदार संघातील पिण्याचे आणि सिंचनाच्या समस्यांवर उहापोह केला. अक्कलपाडा धरण १००% भरण्यासाठी जमीन अधिग्रहणला सुरुवात करण्यात यावी तसेच निधी देखील लवकरात उपलब्ध करून देण्यात यावा त्यावर जल संपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देत संबंधित विभागाला तात्काळ अक्कलपाडा धरण १००% भरण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी असे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी देखील आपण लवकरच उपलब्ध करून देवू असे ते म्हणाले.
धुळे शहराची वाढती लोकसंख्या आणि हद्दवाढ गावांतील समावेश यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तापी पाणीपुरवठा योजना ४० वर्षांपुर्वी कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेची पाईपलाईन जिर्ण झाल्याने तिला गळती लागली आहे. या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो. तापीतून धुळ्याला पाणीपुरवठा करणारी ४० कि.मी. लांबीची जलवाहिनी नव्याने करण्याची गरज आहे. याची देखील प्रशासकीय मान्यता लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरे असे कि, अक्कलपाडा धरण पुर्ण झाले असले तरी भुमी अधिग्रहणामुळे केवळ ६५ % धरण भरले जाते.अक्कलपाडा धरण हे १०० % धरण भरण्यासाठी २०० हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे.
आता लवकरच हे सर्व प्रकल्प पूर्ण होवून १००% कार्यान्वित होणार असल्याची माहिती धुळे लोकसभेच्या खा. डॉ.शोभाताई बच्छाव यांनी दिली. या निर्णयामुळे  धुळे शहरासह शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *