मिल परिसरातील रहिवाशांना सर्वात मोठा दिलासा
सर्व्हे क्रमांक ५२९ वरील हाउसिंग फॉर अर्बन पुअर हे आरक्षण काढून टाकण्यास मान्यता ; आ.अनुपभैय्या यांच्या प्रयत्नांना यश
धुळे शहर
धुळे शहरातील सर्व्हे क्रमांक ५२९ वरील हाउसिंग फॉर अर्बन पुअर हे आरक्षण काढून टाकण्यास मान्यता देत नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांनी सदरचे आरक्षण त्वरित वगळून रहिवाशांना लवकरात लवकर स्वतंत्र उतारे देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला, अशी माहिती आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या तर्फे देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे धुळे शहरातील कामगार, कष्टकऱ्यांचा परिसर असलेल्या मिल परिसरातील रहिवाशांना सर्वात मोठा लाभ मिळणार असून त्यांच्या घरांना हक्काचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केल्याचे अधोरेखित होत आहे. भाजपचे माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी महापालिका सभेत हा विषय मांडून त्याचा ठराव मांडला होता. तो मंजूर करण्यात आला होता.
शहर मंजूर विकास योजनेतील सर्व्हे क्रमांक 529 या जमिनीवरील 5.15 हेक्टर क्षेत्रावरील हाउसिंग फॉर अर्बन पुअर हे आरक्षण वगळून हे क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्याचा विषयही आजच्या चर्चेत होता. या जमिनीवर प्लॉट पडले असून, या प्लॉटची खरेदी-विक्री झाल्यानंतर या प्लॉटवर खरेदीदारांची नावे लागली आहेत. यातील १०२ प्लॉटधारकांनी सातबारा उतारा व लेआउट मंजुरीबाबत महापालिकेकडे विनंती केली आहे. मात्र, ही जागा आरक्षणाखाली येत असल्याने वापरात फेरबदल करणे आवश्यक आहे. याबाबतच्या अंतिम फेरबदल प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यास अंतिम मंजुरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी नगरविकास राज्यमंत्री मिसाळ यांच्याकडे केली. त्यावर मंत्री मिसाळ यांनी सदरचे आरक्षण त्वरित वगळून रहिवाशांना लवकरात लवकर स्वतंत्र उतारे देण्याचा सकारात्मक निर्णय झाला. आजच्या मुंबई झालेल्या बैठकीत अन्य विषयांवरही चर्चा झाली. त्यावर मंत्री माधुरी मिसाळ यांनी सकारात्मक निर्णय दिल्याने आमदार अग्रवाल यांनी त्यांचे आभार मानले.