शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक; धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शने

धुळे जिल्हा

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई पंचनामे त्वरीत करुन मिळावेत,नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे लेखी निवेदनातून केली.

शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे,उपजिल्हाप्रमुख
कैलास पाटील,जिल्हा समन्वयक विलास चौधरी व प्रशांत भदाने यांचा शिष्टमंडळात सहभाग होता.

या निवेदनातील मागण्या अशा-गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई पंचनामे त्वरीत करुन मिळावेत,नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्‍वासन पाळावे व सरसकट कर्जमाफी द्यावी,शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थी अनेक महिन्यांपासून थकीत आहेत,त्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा.

शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य तो हमी भाव मिळावा, शेतकरी बांधवांना विविध योजनांतून दिले जाणारे अनुदान काही बँका परस्पर त्यांच्या पिककर्ज खात्यात वळवितात किंवा थेट रोखून ठेवतात. हा प्रकार पूर्णपणे अन्यायकारक आहे.अनुदान रक्कम कोणत्याही परिस्थितीत बँकांनी थेट कर्ज खात्याता वळवू नये. शेतकर्‍यांचे अनुदान हा त्यांचा अधिकार आहे तो कुणी बळकावू शकत नाही.शेतकर्‍यांना शेती कामासाठी या अनुदानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने शासनाकडून मदत केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांची अनुदान रक्कम कारण नसतांना रोखू नये.खतांची लिंकींग तसेच अप्रमाणित बियाणे रोखण्यास सरकार अपयशी ठरत आहे.मध्यंतरी गुजराथ येथून आलेले 19 लाखांचे अप्रमाणिक बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते. त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

पूर्व मोसमी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे शेतकर्‍यांना कांदा वाचविण्यासाठी कोणतीही संधी मिळाली नाही. शेतकर्‍यांनी कांद्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला होता. परंतु शेतीच्या बांधावर असलेला कांदा सडला व कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत म्हणून एकटी पंचवीस हजार रुपये मदतीची शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे.

विज मंडळाच्या गलथान कारभारामुळे 15-15 तास विज खंडीत होतेच. जळालेले ट्रान्सफर लवकर बदलून दिले जात नाही.विद्युत पोलवरील जीर्ण तारा नवीन टाकण्यात याव्यात तसेच बर्‍याच ठिकाणचे खराब झालेले व सडलेले पोल त्वरीत बदलण्यात यावेत. ज्या भागात जास्तीचा विद्युतभार असेल त्या ठिकाणी नवीन डीपीची व्यवस्था करण्यात यावी. ट्रान्सफार्मर जळाला तर तो लवकर बदलून मिळत नाही, तरी लवकरात लवकर बदलून मिळावा.

लाईनवरील कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने पुरविणे सध्याच्या परिस्थितीत साधनांचा अभाव असल्याने अपघात होणे तसेच खंडीत विद्युत पुरवठा वेळेवर दुरुस्त होण्यास अडचणी, विलंब निर्माण होतात, त्यामुळे लाईनमनला आधुनिक साधनांचा पुरवठा करणे.
तरी शासन स्तरावर आपण शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी तालुकाप्रमुख बाबाजी पाटील ,जनार्धन मासुळे हेमराज पाटील, राजेंद्र पाटील , प्रकाश वाघ, अजय चौधरी, आनंद जावडेकर, विश्वनाथ सोनवणे, विजय चौधरी, जगदीश पाटील, माणिक कोळी, अनिता गिरासे, गुलाब धोबी,तेजस सपकाळ आदी उपस्थित होते असे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *