धुळे जिल्हा
खान्देशातील जेष्ठ कॉंगे्रस नेते तथा माजी मंत्री स्व.रोहिदास पाटील यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने देवपूर धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस.कॉलेच्या मैदानात असलेल्या समाधी स्थळावर आज शुक्रवार दि.१३ जून २०२५ रोजी सकाळी अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आले. या कार्यक्रमात अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त करीत मृतांना श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या समाधीस्थळावर माजी आ.कुणाल पाटील आणि सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.यावेळी श्रीमती लताताई रोहिदास पाटील, ज्येष्ठ सुपूत्र उद्योगपती विनय पाटील, युवा नेते रायबा कुणाल पाटील यांनीही महापुजा केली. विविध पाच धर्मगुरुंच्या उपस्थितीत प्रार्थना झाली. तसेच रक्तदान शिबीराचे उद्घाटन आणि वृक्षारोपण उद्योजक विनय पाटील आणि माजी आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवपूर चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरु सागर कालू यांच्यासह असंख्य तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
अभिवादनपर मनोगत व्यक्त करतांना माजी मंत्री डॉ.हेमंतराव देशमुख यांनी सांगितले कि, स्व. रोहिदास पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांनी राजकारण हे समाजकारणाचे साधन मानून निस्वार्थपणे कार्य केले. त्यांनी धुळे जिल्हयातील गोरगरिब सर्व सामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या संधी धुळ्यात उपलब्ध करुन दिल्या. तरुणांना रोजगार दिला. धुळे तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून अक्कलपाडा धरणाची निर्मिती केली. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी सुखी झाला, धुळे शहराला पिण्यासाठी पाणी मिळाले. सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेसह तापी नदीवरील बॅरेज ही संकल्पना माजी मंत्री स्व. रोहिदास पाटील यांची असून हे प्रकल्प मंजुर करण्याचे काम त्यांनी केले आहे. धुळे जिल्हयासह खान्देशाच्या सर्वांगिण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ.रविंद्र देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शामकांत सनेर, माजी जि.प.सभापती हर्षवर्धन दहिते, माजी जि.प.सभापती संग्राम पाटील, माजी सभापती संजिवनीताई सिसोदे, डॉ.माधुरीताई बाफना, भाजपाचे नेते डॉ.सुशिल महाजन, निवृत्त न्यायाधिश जे.टी.देसले, शिवसेनेचे नेते अतुलभाऊ सोनेवणे, महेशभाऊ मिस्त्रि, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष भा.ई.नगराळे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आदी उपस्थित होते.