धुळ्याहून मुंबई- पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वेसेवा लवकरच ; आमदार अनुप अग्रवाल यांना सेंट्रल रेल्वेचे व्यवस्थापक मीना यांचे आश्वासन
मुंबईतील बैठकीत मालेगाव रोड रेल्वे क्रॉसिंगवर पुलाच्या मागणीचे निवेदन
धुळे जिल्हा
धुळे शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांसाठी धुळे येथून मुंबई व पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वेसेवा सुरू करण्यासह मुंबई व पुण्याहूनही रोज रात्री धुळ्यासाठी एसी कोचसह रेल्वेसेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना आज दिले.
आमदार अग्रवाल यांनी आज मुंबई येथे सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना, रेल्वेचे प्राधान्य मुख्य अभियंता रजनीश माथूर, पीसीओएम एस. एस. गुप्ता, पीसीसीएम अरविंद मालखेडे, सीपीआरओ स्वप्नील नीला, उपसरव्यवस्थापक के. के. मिश्रा आदी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी धुळे शहराच्या रेल्वेशी संबंधित विविष विषयांवर चर्चा करत मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी सरव्यवस्थापक मीना यांनी आमदार अग्रवाल यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
हजारो रेल्वे प्रवाशांची होईल सोय
आमदार अग्रवाल म्हणाले, की धुळे शहरासह जिल्ह्यातील व्यापारी, विद्यार्थी व नागरिक रोज मोठ्या संख्येने पुण्या-मुंबईकडे ये-जा करत असतात. शिवाय धुळ्यासह खान्देशातील हजारो नोकरदार पुणे- मुंबईत वास्तव्यास आहेत. सध्या धुळ्याहून सकाळी धुळे- दादर रेल्वेसेवा सुरू आहे. मात्र, पुण्यासाठी कुठलीही रेल्वेसेवा नाही. रात्रीच्या वेळी मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे स्थानकातून मुंबई व पुणे या दोन्ही महानगरांसाठी रोज रात्री एसी कोचसह तातडीने रेल्वे सुरू करण्याची गरज व्यक्त केली. तसेच मुंबई व पुणे येथूनही धुळ्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू झाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून, याद्वारे रेल्वेलाही मोठे उत्पन्न मिळू शकेल. यामुळे या दोन्ही शहरांसाठी तातडीने रेल्वे सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.
लवकरात लवकर कार्यवाही : मीना
आमदार अग्रवाल यांच्या मुंबई व पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू करण्याच्या मागणीबाबत मीना यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, सद्यःस्थितीत मुंबई व पुणे या दोन्ही रेल्वेस्थानकांच्या फलाट वाढीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच मुंबई व पुण्यासाठी धुळे येथून व पुणे-मुंबईहून धुळ्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू करण्यात येईल.
मालेगाव रोड क्रॉसिंगवर पूल करा : आमदार अग्रवाल
आमदार अग्रवाल यांनी धुळे शहरासाठीच्य रेल्वेशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या विषयावर रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, की मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव रोडवर एलीसी २२ या ठिकाणी धुळ्यात प्रवेश करताना रेल्वे क्रॉसिंग आहे. या महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रेल्वे ये-जा करताना गेट बंद ठेवावे लागत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. यात वाहनधारकांचा बराच वेळ वाया जातो. तसेच दुर्देवाने अपघातांची शक्यताही निर्माण होते. यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवर तातडीने उड्डाणपूल उभारावा, जेणेकरून महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहून अपघातही होणार नाहीत. या बाबत तातडीने सर्वेक्षण करून पुलाला मंजुरी देण्याची ग्वाहीही सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक मीना यांनी आमदार अग्रवाल यांना दिली.