धुळे शहर
तंबाखूची पुडी दिली नाही या कारणावरून झालेल्या वादात एकाचा खून केल्याप्रकरणी एकास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सतीश भास्कर चौधरी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या खटल्याची थोडक्यात हकीगत अशी- शहरातील देवपुर भागात असलेल्या वीटभट्टी परिसरात वास्तव्यास असलेला नरेश रमेश चव्हाण व हुकूम रमेश चव्हाण हे दोघेही ८ जुलै २०११ रोजी दही घेण्यासाठी जात होते. यावेळी महापालिके जवळ सतीश चौधरी याने नरेश चव्हाणकडे तंबाखूची पुडी मागितली.
आपल्याकडे तंबाखू नाही असे नरेशने सतीश चौधरी यांस सांगितले. यामुळे संतापलेल्या सतीश चौधरीने नरेशला मारहाण केली.खाली पडल्याने नरेश जखमी झाला. त्याला अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, पण उपचारादरम्यान नरेश चव्हाण याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात सतीश चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी केला.
आरोप निश्चितीनंतर येथील प्रमुख न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयांत या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजयकुमार सानप, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी हुकूम चव्हाण, मृत भाऊ अनिल चव्हाण, पंच संजय मैनकर, जप्ती पंच शुभम, यांच्यासह शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश मोहने, अधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह एकूण सहा साक्षी न्यायालयासमोर नोंदवण्यात आल्या.
* सुनावलेली शिक्षा व दंड
आरोपी सतीश भास्कर चौधरी यास भा.दं.वि. कलम ३०४ (२) अन्वये पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १००० रुपये दंड, भादंवि कलम ३२३ व ५०४ अन्वये प्रत्येकी एक वर्ष शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अनुक्रमे १ महिना, १५ दिवस व १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.