धुळे जिल्हा
महसुल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित ऍड. प्रविणकुमार परदेशी यास अटक करावी या मागणीसाठी आज धुळे जिल्हा महसुल कर्मचार्यांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले. महसुल कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने या आधी जिल्हाधिकार्यांना लेखी निवेदनातून ईशारा दिला होता.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेतील सहाय्यक महसुल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांचेवर ६ जून २०२५ रोजी हल्ला करीत मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. महसुल कर्मचारी यांना मारहाण करण्याच्या घटना या धुळे जिल्हयात वारंवार होत आहेत.
सुरेश पाईकराव, सहाय्यक महसुल अधिकारी तहसिल कार्यालय, धुळे, तसेच साक्री तालूक्यात तलाठी यांना झालेली मारहाण तसेच विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करुन कर्मचारी यांचेत दहशत निर्माण करण्यात येत आहे. यापूर्वीच्या झालेल्या घटनेमध्ये हल्लेखोर यांचेवर कडक कारवाई होत नसल्याने त्यांना कायदयाचा धाक राहीलेला नाही. कर्मचारी यांचेत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे सहाय्यक महसुल अधिकारी चौधरी यांना मारहाण करणारा आरोपी ऍङ प्रविणकुमार परदेशी यांस तात्काळ अटक करण्यात यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनावर धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोरी हरणे,सरचिटणीस योगेश जिरे, अध्यक्ष सुरेश पोईकराव आदींच्या सह्या आहेत.