धुळे जिल्हा
धुळे शहरासह जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईद सणाचा उत्साह दिसत आहे. आज सकाळी धुळे शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान येथे एकत्र येत सामुहिक नमाज पठण केले. यावेळी मानव कल्याणासाठी आणि विश्व बंधुत्वासाठी प्रार्थना करण्यात आली. सामुहिक नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
बकरी ईद सणाला मुस्लिम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. या सणाच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांपासुन मुस्लिम बांधवांकडून जोरदार तयारी सुरु होती. इस्लामिक पंचांगानुसार जिलहज्ज महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी सामुहिक नमाज केल्यानंतर जनावरांची कुर्बानी दिली जाते.
धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी ईदगाई मैदान येथे दरवर्षी सामुहिक नमाज अदा केली जाते. त्यानुसार आज देखील मुस्लिम बांधवांनी उत्साहपुर्ण वातावरणात सामुहिक नमाज पठण केले. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.