धुळे जिल्हा
माजी कृषी व पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने दि.13 जून रोजी धुळ्यात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आले असून यावेळी भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान धुळे जिल्हयात माजी मंत्री स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विविध लोकोपयोगी उपक्रमांकचेही आयोजन करण्यात आले आहे.
खान्देश नेते व अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक माजी मंत्री स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची शुक्रवार दि.13 जून 2025 रोजी प्रथम जयंती साजरी होत आहे. त्याअनुषंगाने धुळे जिल्हयात विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना कपडे वाटप, शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्वच्छता अभियान, ज्येष्ठ तसेच गुणवंताचा सत्कार असे विविध उपक्रम स्थानिक कार्यकर्ते व हितचिंतकांडून राबविले जाणार आहेत.
समाधीस्थळी अभिवादन
देवपूर,धुळे येथील एसएसव्हीपीएस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या माजी मंत्री स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या समाधी स्थळावर शुक्रवार दि.13 जून रोजी सकाळी 8.30 वा. अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पाच धर्मगुरुंच्या उपस्थितीत प्रार्थना होणार आहे. त्यांनतर सार्वजनिक अभिवादन कार्यक्रम पार पडेल.
माजी मंत्री स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि.13 जून रोजी सकाळी 9 वा. एसएसव्हीपीएस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर होणार आहे. यावेळी रक्तदात्यास भेट वस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9 वा. वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला धुळे तालुक्यासह शहर व जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याअनुषंगाने रक्तदान,वृक्षारोपण व अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन एसएसव्हीपीएस कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.