धुळे मनपातर्फे आजपासून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण

धुळे मनपातर्फे आजपासून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण
कोल्हापूरच्या सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शनला काम

आमदार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार कार्यवाहीला प्रारंभ

धुळे शहर

मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या धुळेकरांना दिलासा देण्यासाठी गुरुवारपासून (ता. ५) येथील महापालिकेतर्फे मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण तसेच अँटी रेबीज लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेची या मोहिमेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी शहरातील वरखेडी रोडवर ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटर (एबीसी सेंटर) कार्यान्वित करण्यात आले असून, तेथे ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. धुळेकरांची मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून मुक्तता करण्याच्या हेतूने आमदार अनुप अग्रवाल यांनी याबाबत महापालिकेला सूचना केली होती. त्यानुसार ही कार्यवाही होत आहे.

शहरात काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव धुळेकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या काही दिवसांत तर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांसह अनेकांचा जीव गेला. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त धुळेकरांकडून होत होती. याबाबत आमदार अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्यासह प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम तातडीने सुरू करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती.

मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण तसेच अँटी रेबीज लसीकरण करणे आवश्यक आहे. यातून मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया ही केंद्र शासनाची संस्था नियंत्रण व मार्गदर्शन करते. या नियमानुसार मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत प्राणी कल्याण संघटना, संस्थांनाच हे काम करण्याची परवानगी आहे. त्यानुसार धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरणासाठी कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. या मोहिमेस गुरुवारपासून प्रारंभ होत असून, वरखेडी रोडवरील एबीसी सेंटरमध्ये संस्थेतर्फे मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणे, शस्रक्रियेनंतर तीन-चार दिवस त्यांचे संगोपन करणे, त्यानंतर मोकाट कुत्र्यांना जेथून नेले होते तेथे सोडण्यात येणार आहे. या निर्बीजीकरणातून भविष्यात मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा घालणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
धुळे शहरवासीयांनी महापालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे, परिसरात उघड्या जागांवर उष्टे अन्न फेकू नये, हाड-मांस टाकू नये, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून सावधगिरी बाळगावी, आपल्या लहान मुलांसह ज्येष्ठांना एकटे सोडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *