उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा केला सन्मान
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला. यावेळी महा आवास अभियानांतर्गत यशस्वीरित्या घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा तसेच या अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी आणि गृहनिर्माण अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पक्की घरे उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील चित्र बदलत असल्याची भावना आमदार श्री. पावरा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज चौहान यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी 3 वाजता बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाला. त्या अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा आणि तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयांना देखील या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवणे तसेच यशस्वीरित्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांची चावी वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पंचायत समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आर. सी. पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस.एस.पटेल मेमोरियल हॉल, शिरपूर येथे आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम पावरा तसेच गटविकास अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी आर के गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे, आणि तालुक्यातील सरपंच, पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आणि तालुक्यातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाची प्रक्षेपणाची व्यवस्था असल्याने शिरपूर तालुक्यातील सुमारे 500 लाभार्थी या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरले.
यावेळी महा आवास अभियानांतर्गत यशस्वीरित्या घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांच्या सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

या योजनेअंतर्गत सर्वात जास्त प्रस्ताव सादर करणाऱ्या आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. यात आनंदा पाटील , खंबाळे, आर के गावित, शेमल्या, वनिता पावरा नांदर्डे यांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत गृहनिर्माण अभियंता म्हणून सर्वात जास्त घरकुलांची कामे पूर्ण करणाऱ्या अभियंता दिग्विजय ठाकरे ,प्रीतम वराडे आणि इतरांच्या देखील सन्मान करण्यात आला. याशिवाय या योजनेअंतर्गत संगणकीय कामकाज करणारे कर्मचारी विकास पाटील, सुशील पावरा, एम एस शेख यांच्या देखील सन्मान करण्यात आला.
यावेळेस गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी प्रास्ताविकात या योजनेबद्दल माहिती देऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे हा शासनाचा हेतू असल्याचे सांगितले. अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंह राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे सीडीपीओ वैशाली निकम यांनी केले.