धुळे शहर
धुळे येथील ‘गुलमोहर विश्रामगृह कॅश’ प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा तकलादू असल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारचा इतके मोठे प्रकरण दडपण्याचा डाव दिसतो, असा आरोप आज पत्रकार परिषदेतून केला आहे.
शिवसेना उबाठाचे मा.आ. अनिल गोटे यांनी सांगितले, पोलिसांनी ९ दिवसांनंतर गुन्हा नोंदविला असला तरी यातील मूळ तक्रारदार अर्थात माझ्यासह नरेंद्र परदेशी यांचे जबाब घेणे आवश्यक होते. ते न घेता कोणत्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला हा प्रश्नच आहे. समाधानकारक हिशोब न देता येणे या कलमाखाली गुन्हा नोंदविला गेला आहे. प्रत्यक्षात फौजदारी संघटीत गुन्हेगारी, खंडणी गोळा करणे, घडलेल्या घटनेची खोटी माहिती देणे, पुरावा नष्ट करणे, खोटा पुरावा सादर करणे यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विविध कलम लावणे आवश्यक होते. पण तसे झालेले नाही. घटनास्थळी लावलेले कुलूप, हातांचे ठसे घेणे अपेक्षित होते. ते घेतलेले नाही. मग ९ दिवस पोलिसांनी नेमके काय केले? हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीकडून तपास केला जाईल, असे सांगितले होते. पण, कुठे आहे एसआयटी असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांसह संयुक्त चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले होते, त्याचेही पुढे काय झाले. सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचे आहे असा आरोपही गोटे यांनी केला. प्रकरण दडपायचे होते तर गुन्हा दाखल करायचे नाटक कशाला केले? असा सवालही त्यांनी केला.