धुळ्यातील ‘गुलमोहर कॅश’ प्रकरणी अखेर तिघांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

 

धुळे जिल्हा

गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांच्या घबाड प्रकरणी अखेर धुळे शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ दिवस केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये मंत्रालयातील निलंबित कक्ष अधिकारी तथा विधिमंडळ अंदाज समितीचा स्वीय सहायक किशोर पाटील, रामकुमार मोगले आणि एक अज्ञात व्यक्ती, अशा तीन संशयितांविरुद्ध पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कलम १२४ महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात खळबळ उडविणार्‍या धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्राम गृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या एक कोटी ८४ लाख ८४ हजारांच्या रोकड प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी १७३/३ बीएनएसएस कायद्यांतर्गत २१ मे रोजी चौकशीचे आदेश दिले होते. हि रक्कम विधीमंडळ अंदाज समितीच्या धुळे जिल्हा दौर्‍यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्विय सहाय्यक किशोर पाटील यांनी गोळा केल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते अनिल गोटे यांनी केला होता.

दरम्यान, या रोकड प्रकरणाचे चौकशी अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी नऊ दिवसांत चौकशी पूर्ण करून शुक्रवारी अधीक्षक धिवरे यांच्याकडे अहवाल सादर केला. त्या अहवालावर विधिज्ञांचा कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. तसे सर्व नोटिंगवर घेण्यात आले. या अनुषंगाने मंत्रालयातील कक्ष अधिकारी तथा अंदाज समितीचा स्वीय सहायक किशोर पाटील, राजू मोगरे आणि अन्य एकावर धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी शहराचे पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. तपासात यापुढे जे काही निष्पन्न होईल, तशी कायदेशीर कलमे वाढविण्यात येतील. त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर निर्गती करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणात प्राप्तिकर विभागही स्वतंत्र तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *