सहावर्षीय अलिनासाठी आमदार अनुपभय्या अग्रवाल ठरले `देवदूत’!

`एबी फाउंडेशन’च्या वैद्यकीय सेवाभावी उपक्रमातून केली मदत;
दोन महिन्यांपासून होणाऱ्या किडनीच्या असहाय वेदनांतून मुक्तता


धुळे शहर

दोन ते अडीच महिन्यांपूर्वी अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेला किडनीच्या इन्फेक्शनचा त्रास सुरू झाला. यातून लेकीचे होणारे हाल पालकांचे काळीज कुरतडत होते. या त्रासातून लेकीची सुटका व्हावी म्हणून पालकांच्या तिच्यावर उपचारांसाठी आज या रुग्णालयात तर उद्या त्या रुग्णालयात अशा खेपा सुरू झाल्या. विविध रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवल्या. तिच्यावर शस्रक्रियेसह उपचारांसाठी सुमारे लाखभर रुपये खर्च येणार होता. मात्र, इतकी मोठी रक्कम उभारणे शक्य नव्हते. शासनाच्या वैद्यकीय योजनांचा लाभ घ्यावा म्हटले, तर कागदपत्रांची पूर्तता नव्हती. यामुळे बालिकेला वेळेवर उपचार मिळू शकत नसल्याने तिला होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला. यामुळे हतबल झालेल्या पालकांपुढे आता काय करायचे आणि कुठे जायचे, असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला होता.
धुळे शहरातील नंदी रोडवरील शिवाजीनगरमधील पॉवरलूम मजूर आतिक मोहंमद शरीफ अन्सारी यांच्या सहावर्षीय अलिना या बालिकेची ही कहाणी. अखेर धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार, धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांनी तसेच ते आश्रयदाते असलेल्या एबी फाउंडेशनने अलिनाला वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचा हात दिला आणि तब्बल दोन महिन्यांपासून होत असलेल्या ससेहोलपटीतून तिची अवघ्या चार दिवसांत सुटका करत तिला जीवदान दिले. आमदार अनुपभय्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे गहिवरलेल्या आतिक अन्सारी आणि अलिना अन्सारी या बापलेकीच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत होते.

उपचारांत का आल्या अडचणी?
अलिनाला दोन ते अडीच महिन्यांपासून किडनी इन्फेक्शनचा मोठा त्रास सुरू झाला. अलिनाचे वडील आतिक अन्सारी यांनी तिच्यावर योग्य ते उपचार व्हावेत म्हणून विविध रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवायला सुरवात केली. खासगी रुग्णालयांत त्यासाठी सुमारे एक लाखांचा खर्च सांगण्यात आला. मात्र, तेवढी मोठी रक्कम कशी उभी करणार, असा प्रश्न अन्सारी यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांच्या माध्यमातून उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यासाठी आवश्यक कुठलीच कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था अन्सारी कुटुंबीयांची झाली.

एबी फाउंडेशनची मिळाली माहिती
आतिक अन्सारी यांना धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार अनुप अग्रवाल यांनी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या वैद्यकीय सेवाभावी उपक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी शहरातील जुन्या महापालिकेजवळील एबी फाउंडेशनचे कार्यालय गाठले. तेथे आमदार अग्रवाल व फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांची भेट घेत अलिनावर ओढवलेला प्रसंग आणि त्यासाठी विविध रुग्णालयांत कशी ससेहोलपट झाली, याची आपबिती सांगितली. एवढा प्रचंड त्रास होत असताना अलिनाला कुठल्याच रुग्णालयात दाखल करून का घेण्यात आले नाही, याची समन्वयकांनी माहिती घेतली असता त्यांना धक्काच बसला. अलिनाच्या पालकांनी शिधापत्रिकेमध्ये अलिनाच्या नावाचा समावेशच केलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे अलिनावर उपचारांसाठी आवश्यक आयुष्यमान भारत हेल्थ कार्डही नव्हते. तिच्या आधार कार्डच्या ई केवायसीची पूर्तताही केलेली नव्हती. त्यामुळे अलिनाला शासनाच्या कुठल्याच वैद्यकीय सेवा योजनेचा लाभ मिळू शकला नाही.

फाउंडेशनने केली कागदपत्रांची पूर्तता
आमदार अनुपभय्यांनी सर्वप्रथम फाउंडेशनच्या समन्वयकांना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची तातडीने पूर्तता करण्याची सूचना केली. त्यानुसार समन्वयक देवरे व त्यांचे सहकारी निलेश चौधरी यांनी अवघ्या तीन ते चार दिवसांतच सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. यामध्ये अलिनाचे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, आधार कार्डची ई-केवायसी करणे, तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड केले.
सेवा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया, उपचार
कागदपत्रांची पूर्तता करेपर्यंत अलिनाला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे सुरवातीला हा त्रास कमी करण्यासाठी काही इंजेक्शन व औषधे देण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अलिनाला शहरातील सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. राजेश अग्रवाल व त्यांच्या टीमने अलिनावर तातडीने उपचार सुरू केले. तसेच तिच्यावर यशस्वी शस्रक्रियाही करण्यात आली. तब्बल दोन महिने होणाऱ्या त्रासामुळे अलिनाचे खूप हाल होत होते. ते उघड्या डोळ्यांनी पाहताना अलिनाच्या पालकांचे मन खूप खचत होते. मात्र, आमदार अग्रवाल यांच्यामुळे अलिनावर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याने तिच्या पालकांनी आमदार अग्रवाल व एबी फाउंडेशनचे शतशः आभार मानले. तुमचे उपकार शब्दांतून फेडणे शक्य नसले तरी तुम्ही आमच्यासाठी देवदूत म्हणूनच धावून आलात. तुमच्यामुळेच आज लेकीला नव्याने जीवन प्राप्त झाल्याची भावनाही आतिक अन्सारी यांनी व्यक्त केली. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार अनुप अग्रवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

अशी झाली `एबी फाउंडेशन’ची स्थापना
भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष तसेच धर्मयोद्धा म्हणून काम करताना पूर्वीपासूनच आमदार अनुप अग्रवाल यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत विविध शासकीय योजनांसह वैयक्कित दातृत्वातून शहरातील गोरगरीब, वंचितांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गरजा पूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरवासीयांनी विधानभवनात धुळे शहराचे प्रतिधित्व करण्याचा बहुमान अनुपभय्यांना दिला. आमदार म्हणून राजकीय कारकीर्दीत एक पाऊल पुढे टाकतानाच आमदार अनुपभय्यांनी धुळे शहरासह जिल्हाभरातील सर्वसामान्य, गरीब, वंचित घटकांतील गरजूंना आरोग्याच्या प्रश्नावर कुठलीच अडचण येऊ नये, कोणताही रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहू नये, हा विचार सत्यात उतरविण्यासाठी एबी फाउंडेशनची स्थापना केली.

रुग्णांसाठी एबी फाउंडेशन बनले `देवदूत’
कुठलाही राजकीय अजेंडा, जात-पात, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन गेल्या सहा महिन्यांपासून फाउंडेशनचे रुग्णसेवेचे कार्य रात्रंदिवस अविरत सुरू आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत दुर्धर आजारांशी लढा देणाऱ्या हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात यश आले. यात कॅन्सर, हृदयरोगासह विविध आजारांनी पीडित ३५० ते ४०० रुग्णांवर धुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयांसह मुंबईतील टाटा, नायर, वाडिया, केईएम, जसलोक, हिंदुजा आदी नामांकित रुग्णालयांत उपचारांसह शस्रक्रिया करून त्यांना जीवनदान मिळवून देण्यात फाउंडेशनला यश आले. अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यातही फाउंडेशन अग्रेसर आहे. यामुळे रुग्णांसाठी एबी फाउंडेशन जणू देवदूतच बनले आहे.

रुग्ण, नातेवाइकांनी संपर्क साधावा
धुळे महानगरासह परिसरातील दुर्धर आजारांचा सामना करणाऱ्या ज्याही रुग्णांना धुळे शहरासह मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत वैद्यकीय उपचारांची, शस्रक्रियेची गरज असेल त्यांनी शहरातील जुन्या महापालिकेमागील एबी फाउंडेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. तेथे नावनोंदणी करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून रुग्णांवर अत्यावश्यक ते उपचार वेळेत करता येतील, असे आवाहनही आमदार अनुप अग्रवाल व एबी फाउंडेशनचे समन्वयक कमलेश देवरे यांनी केले.


आतिक अन्सारी
माझ्या सहावर्षीय अलिनाला दोन महिने किडनीच्या इन्फेक्शनमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. पैशांअभावी तसेच वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी तिच्यावर उपचार करण्यात अनंत अडचणी आल्या. मात्र, आमदार अनुपभय्यांनी मदतीचा हात पुढे करत अलिनाला तातडीने उपचार मिळवून दिले. एबी फाउंडेशनने तातडीने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. यामुळेच आज माझ्या लेकीला जीवदान मिळाले आहे. आमदार अनुपभय्या आणि त्यांच्या एबी फाउंडेशनचे स्थान कायम आमच्या हृदयात राहील.
आतिक अन्सारी, अलिनाचे वडील, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *